तिबोटी खंड्या जागेच्या शोधात; कर्नाळ्यात अभयारण्यात घरटं बांधण्यासाठी घालतोय घिरट्या
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पावसाची चाहूल घेऊन येणारा तिबोटी खंड्या अगदी वेळेत कर्नाळा पक्षी अभय आरण्यात दाखल झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस अभयारण्यात दाखल झालेल्या तिबोटी खंड्याच्या दोन जोड्यांच्या ठिकाणाचा वेध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. घरटं बांधण्यायोग्य जागेच्या शोधात हा खंड्या अभयारण्य परिसरात घिरट्या घालत असल्याची शक्यता कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून तिबोटी खंड्या हा पक्षी दरवर्षी मे महिन्यातच पक्ष्यांचे नंदनवन समजल्या जाणार्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात दाखल होत असतो. यंदादेखील तो वेळेत दाखल झाला आहे. विणीच्या हंगामाआधी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी नर आणि मादी एकमेकाला शीळ घालून साद देत असल्याचा आवाजावरून तिबोटी खंड्या अभयारण्यात दाखल झाल्याच्या वृत्तावर वन विभागाच्या अधिकार्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. पक्षी अभयारण्यातील कर्मचारी आवाजाचा वेध घेत तिबोटी खंड्याच्या घरट्याचा शोध घेत आहेत.
घरटे बांधण्यायोग्य जागा उपलब्ध होताच तिबोटी खंड्या घरटे बांधण्याच्या कामाला सुरवात करतात. यामुळे वनविभागाला तिबोटी खंड्याच्या वास्तव्याचे ठिकाण कळते. वनविभागाकडून दरवर्षी हा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. भारतात आढळणार्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान खंड्या आहे. या पक्ष्यांच्या समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होत असून, हा पक्षी भूतान, भारतातील ईशान्य आणि अग्नेय भागात आढळतो. तसेच तो श्रीलंकेतही आढळतो. तेथून हा पक्षी मे महिन्याच्या सुमारास प्रजननासाठी रायगडमध्ये येतो. रायगड जिल्ह्यात तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहतो. त्यानंतर तो परत जातो. भारतात खंड्या पक्ष्याच्या 12 प्रजाती आढळतात. त्यांपैकी तिबोटी खंड्या हा पक्षी आकाराने सर्वात लहान आहे. त्यांची लांबी 12 सेमी ते 14 सेमी इतकी असते.
विणीचा काळ नाजूक या पक्ष्याचा विणीचा काळ अत्यंत नाजूक मानला जातो. कारण, याच कालावधीत हे पक्षी प्रजनन करुन आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. सर्वसाधारणपणे. नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस पाणी पातळीचा अंदाज घेऊन मातीमध्ये हे पक्षी बिळ खणून त्यामध्ये आपले घरटे तयार करतात. महत्त्वाचं म्हणजे, आपत्ती काळात पर्याय म्हणून दुसरं घरटंदेखील हे पक्षी जवळच तयार करतात.
पाच अंडी ओहळाशेजारी किंवा मातीच्या कडामध्ये नर आणि मादी बिळ करतात. हे काम जून ते जुलै महिन्यात करतात. स्वत: तयार केलेल्या या घरट्यात मादी 5 अंडी घालते. मात्र, ही अंडी एकाच वेळी न घालता मादी दिवसाला एक अंडी घालते. मादीने अंडी दिल्यानंतर नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. त्यांचा अंडी उबवण्याचा कालावधी हा साधारण 17 ते 18 दिवसांचा असतो. तिबोटी खंड्याचे कोळी, बेडूक, पाल, सापसुरळी, छोटी खेकडी हे आवडते खाद्य आहे.
जिल्हा पक्षी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मागील वर्षी तिबोटी खंड्या ला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित केले आहे.