वीजवाहिन्या, खांबांवर पक्षीरोधक यंत्रणा बसविणार

| रोहा | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून महावितरणच्या वीजवाहिन्यांवर पक्षी बसल्याने तसेच उड्डाणादरम्यान वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत होत्या. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून काही वेळा वीज वाहिन्यांमध्ये ट्रिपिंग होऊन ग्राहकांचा वीज पुरवठाही खंडित होत असते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून वीज महावितरण कंपनीने आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या वीजवाहिन्या व खांबांवर पक्षीरोधक यंत्रणा बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या यंत्रणेमुळे पक्षी वीज वाहिन्यांवर बसण्याचे प्रमाण कमी होणार असून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच, पक्ष्यांमुळे होणारे ट्रिपिंग व तांत्रिक बिघाड कमी होऊन ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. महावितरणच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असून वन्यजीव संरक्षण व ग्राहक सेवा या दोन्ही उद्दिष्टांची प्रभावीपणे पूर्तता होत आहे. महावितरणकडून भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यात येणार असून नागरिकांनीही वीज यंत्रणांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version