| नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील निडी गावातील वीज वाहिन्या जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या वीज वाहिन्या वारंवार तुटत आहेत. गावातील रहिवासी संतोष मढवी यांच्या घरावर तीन वेळा वीजवाहिनी तुटून पडली आहे. त्यामुळे भविष्यात जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याआधी वीज वितरण कंपनीने गावातील विजवाहिन्या संपूर्णतः बदलून नव्याने टाकाव्यात अशी मागणी मढवी यांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
सद्य स्थितीत निडी गावातील वीजवाहिन्यांचे काम शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी जुन्याच वीज वाहिन्यांना जोड देऊन तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे. मात्र या वीजवाहिन्या पुन्हा कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. तसेच यामुळे गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटनाही घडत आहेत. गावात वीजदुरूस्तीच्या कामात वीजकर्मचा-यांनाही अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने हा वीजपुरवठा सुरळीत होण्यास तासनतास लागत असतात. त्यामुळे नागरिकांना दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस तर अनेक समस्यांना व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीने यावर त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणीही आकाश मढवी यांनी केली आहे.
निडी गावातील जीर्ण झाल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी प्रस्ताव पाठिवला असुन याप्रकरणी पाठपुरावा सुरू आहे. नवीन वीजवाहिन्या कार्यालयात उपलब्ध होताच निडी गावातील वीजवाहिन्या तातडीने बदलण्यात येतील. मात्र त्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. – वैभव गायकवाड, कनिष्ठ अभियंता, नागोठणे