| माथेरान | वार्ताहर |
पावसाळ्यातील दर शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसांत पर्यटकांचा महापूर दिसून येत आहे. वर्षाऋतुमधील ही पर्यटन वारी करण्यासाठी राज्यातील विविध भागांतील पर्यटक मोठया प्रमाणावर हजेरी लावत आहेत.
दर शनिवारी मर्यादेपेक्षा अधिक पर्यटक दाखल होत असल्याने अनेकदा घरगुती लॉज मिळणे कठीण होते त्यामुळे पर्यटकांना नाईलाजाने माघारी जाण्याची वेळ येत असते. त्यामुळे अनेकदा पर्यटक यामध्ये विशेषतः कॉलेज युवक युवतीचे जथ्थेच्या जथ्ये एक दिवसीय पर्यटनासाठी पहाटेपासून दाखल होत असतात. पावसाळ्यात माथेरान स्थळाचे निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसते. सर्वत्र हिरवीगार वनराई आणि डोंगर न्हाऊन निघाल्यावर त्यावरून पडणारे शुभ्र जलप्रपात मनाला मोहीत करतात. माथेरान मध्ये पावसाळी धबधबे नसल्याने रविवारी येणारे बहुधा सर्वच पर्यटक थेट शारलोट लेक वरील ओसंडून वाहणाऱ्या सुरक्षित पाण्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. या दोन दिवसांत छोट्या मोठ्या स्टोल्स धारकांना वडापाव, भजी, चहा, मका कणीस यातून चांगले उत्पन्न मिळते. तर हॉटेल मॅनेजमेंट सह गावातील लॉज धारकांना, रेस्टॉरंट तसेच चिक्की चप्पल व्यावसायिक यांना शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उत्तम प्रकारे व्यवसाय प्राप्त होत आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर चालताना एकप्रकारे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.
आम्ही नेहमीच पावसाळ्यात एकदिवसीय पर्यटनाला सहकुटुंब येतो. खरोखरच माथेरान हे खूपच सुंदर ठिकाण आहे.इथे आलो की मनातील सर्व मलभ दूर होते, नेहमीच्या कामातील शीण केव्हा निघून जातो हे समजत नाही. कमी खर्चातील हे पर्यटनस्थळ पावसाळ्यात नक्कीच पाहण्यासारखे आहे.
आवेश जगताप,
पर्यटक मुंबई