प्लास्टिकमुक्तीसाठी नगर परिषदेचा उपक्रम
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण नगर परिषद आणि सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने पाहत नगर परिषदेने यावर्षी जोरदार मोहीम राबवण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘चिपळूण होम मिनिस्टर 2025’ ही विशेष स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
यापूर्वी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत चिपळूणमधील शाळा, संस्था, सामाजिक मंडळे यांच्याशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर महिलांना या उपक्रमात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी आता चिपळूण होम मिनिस्टर 2025 ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ही स्पर्धा 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडणार आहे.
चिपळूण शहरातील कोणतीही महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकते. महिन्यातून पंधरा दिवस प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलांना विशेष कुपन्स देण्यात येणार आहेत. या कुपनांच्या आधारे लकी ड्रॉ घेण्यात येईल, आणि विजेत्या महिलेला मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी खेळण्यात येणाऱ्या होम मिनिस्टर या विशेष खेळातून अंतिम विजेतीची निवड होणार असून, या विजेतीला सोन्याची नथ भेट दिली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल. विशेष म्हणजे, या मोहिमेत इतर महिलांना सहभागी करून घेणाऱ्या महिलांनाही विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या मोहिमेचा उद्देश केवळ प्लास्टिक गोळा करणे नसून, शहरातील महिला वर्गात पर्यावरणीय भान निर्माण करणे, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सहभाग वाढवणे हा आहे. या उपक्रमासाठी नावनोंदणी करण्यासाठी इच्छुक महिलांनी 7276041701 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले नाव व पत्ता पाठवून नोंदणी करावी. प्लास्टिक नेण्यासाठी संदेश आल्यानंतर गाडी घरी येऊन प्लास्टिक घेऊन जाईल व कुपन देईल. या संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन विशाल भोसले (प्रशासक तथा मुख्याधिकारी, चिपळूण नगर परिषद) आणि भाऊ काटदरे (संचालक, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था) करत आहेत.
चिपळूण होम मिनिस्टर 2025 ही स्पर्धा म्हणजे प्लास्टिक विरुद्धच्या लढ्यात महिलांचे सामर्थ्य दाखवण्याची एक सुंदर संधी आहे. त्यामुळे एकत्र येऊन चिपळूणला हरित आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आपला हातभार लावावा.
– विशाल भोसले, मुख्याधिकारी