। रायगड । प्रतिनिधी ।
मागील सरकारने गाजावाजा करून किहीम येथे आद्य पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व पर्यावरण अभ्यास केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते. तीन वर्षांपूर्वी कामाला सुरुवातही झाली. 60 टक्के बांधकाम झाल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी सत्तापालट झाल्याने केंद्राचे काम बंद पडले ते अद्याप सुरूच झालेले नाही. निदान नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने पक्षी केंद्राच्या बांधकामाकडे लक्ष घालून पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यटन विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील किहीम येथे पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्याबरोबर केंद्राचे कामही सुरू झाले होते; मात्र त्यानंतर सत्तांतर झाले आणि काम रखडले. एक पर्यटन क्षेत्र म्हणून एक वेगळी ओळख केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. या जागेत 2022 पासून केंद्राचे काम सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
पक्षी अभ्यास केंद्राची उद्दिष्टे
पर्यटनवाढीला अधिक चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी किहीम येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पक्षी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येथे त्यांनी भारतातील पक्ष्यांचा वावर, त्यांच्या सवयी, विविध प्रजाती, त्यांचे वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. याबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांचाही अभ्यास केला जाणार आहे.
असे असेल संशोधन केंद्र
पक्षी केंद्रात सलीम अली यांच्याविषयी माहिती असणारे केंद्र बांधले जाणार आहे. सलीम अली यांनी पक्ष्यांविषयी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय, देशातील वेगवेगळ्या जातीच्या, कोकणातील वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी, यासाठी डिजिटल माहिती केंद्र, पक्ष्यांविषयी असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी विक्री, हे सर्व केंद्रात उपलबध असेल. अभ्यास केंद्राचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे.
पडीक शाळेची डागडुजी
पक्ष्यांबद्दल आकर्षण असलेल्या पक्षीप्रेमींबरोबर पर्यटनवाढीसाठी किहीम येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सलीम अली यांच्या नावाचे पक्षी सेंटर व अभ्यास केंद्र रायगड जिल्हा परिषद व वन विभागामार्फत उभे केले जाणार आहे. यासाठी किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा 2007 पासून बंद आहे. शाळेच्या दोन इमारती असून सात वर्गखोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्गखोल्या सुस्थितीत असून चार वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. शाळेची जागा अंदाजे 30 गुंठे क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम येथे डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यासकेंद्र उभे केले जाणार आहे. पक्षी अभ्यास केंद्रातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. बांधकाम विभागाने इमारतीचे बहुतांश काम प्रमाणात पूर्ण केले आहे. काही दिवसांत स्पॉट व्हिजीटसंदर्भात संबंधित अधिकार्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे. यात अन्य विभागांचाही सहभाग असल्याने सर्व विभागाच्या अडचणींचा विचार करून तोडगा काढला जाईल.
– सत्यजित बडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद रायगड