वाहतूक नियोजनात ग्रामपंचायत हतबल
| महाड | वार्ताहर |
महाड औद्योगिक वसाहतीमधील बिरवाडी गावात असलेली वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे वाहन चालक, शालेय विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. बिरवाडी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, या सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महाड औद्योगिक क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एमआयडीसीचा बहुतांश भाग हा बिरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने बिरवाडी गावाचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवाय महाड औद्योगिक परिसरातील वाळण, वरंध विभागातील नागरिकांना बिरवाडी ही जवळची बाजारपेठ असल्याने याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. महाड औद्योगिक वसाहतीमधील निरवाडी श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. मात्र, तरीदेखील योग्य नियोजन होत नसल्याने वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि इमारतींचे बांधकाम याबाबत परवाने देत असताना ग्रामपंचायतीने वाहन पार्किंग, घनकचरा व्यवस्थापन आदीबाबत संबंधित विकासकांना सूचना देणे आवश्यक आहे. मात्र, नियोजनाचा विचार न करताच परवाने दिले जात असल्याने इमारतींची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिरवाडीमधील वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे नियोजनबद्ध आराखडा मात्र केला जात नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विविध समस्यांबरोबर बिरवाडीमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अरुंद रस्ते आणि दुकानांच्या समोरील वाढलेल्या शेड यांनी अधिक अरुंद असलेला रस्ता वाहतुकीस अपुरा पडत आहे. बिरवाडीमधील मुख्य बाजारपेठदेखील अरुंद होत चालली आहे. याचा त्रास बाजारपेठेत येणार्या नागरिकांना होत आहे.
महाड औद्योगिक पोलीस ठाण्याकडून बिरवाडीमध्ये पोलीस चौकी उभी केली असली तरी या ठिकाणी पोलीस कायमस्वरूपी नसल्याने वाहन चालकांची मनमानी वाढत चालली आहे. बिरवाडी मध्ये मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क केली जातात, यामुळे अवजड वाहने तसेच एसटी बसेसना मोठा अडथळा निर्माण होतो. अशावेळी वाहतूक कोंडीला नागरिकांना कायम सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी असलेल्या मिनिडोर रिक्षा चालकदेखील आपल्या रिक्षा दुतर्फा लावून बसत आहेत. बिरवाडीमध्ये असलेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनादेखील या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना त्रास होतो. मात्र, तरीदेखील बिरवाडी ग्रामपंचायतीने याबाबतीत कधीच ठोस पावले उचललेली नाही. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे उघडपणे प्रतिक्रिया देण्यास कोणीही नागरिक तयार होत नाहीत. मात्र, ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.