महायुतीचे फंडे, सहकार्याचे वांदे

महायुतीच्या समन्वय मेळाव्यात कडू आठवणींनाच आली उकळी


| रायगड | आविष्कार देसाई |

राज्यातील जागा वाटपावरुन महायुतीमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये याबाबत नकारात्मकता पसरत आहे. महायुतीमधील नेत्यांमध्ये समन्वय राहावा. यासाठी रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात समन्वय मेळावे घेण्यात येणार आहेत. मात्र, अलिबाग येथील हॉरीझोन सभागृहात आज पार पडलेल्या महायुतीच्या समन्वय मेळाव्यात महायुतीमधील नेत्यांनी 2014 ते 2024 या कालावधीत घडलेल्या कडू आठवणींनाच तापलेल्या भाषेत उकळी दिली. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत ते एक दिलाने काम करणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

समन्वय मेळावा चार वाजता सुरु होणार होता. तो अर्ध्या तासाने सुरु झाला. त्यानंतर भाजपाचे सतिश धारप, भाजपाचे समन्वयक अ‍ॅड. महेश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार अनिकेत तटकरे, हर्षल पाटील हे तब्बल दीड तास उशिराने कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्याआधीच महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरुवातील शिंदे गटातील नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी 2014 ते 2024 पर्यतचा इतिहास सर्वांपुढे वाचला. त्यामध्ये त्यांनी भाजपा आणि शिवसेना कशी विरोधात होती, एकमेकांच्या जीवावर कसे उठलो होतो. याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. अनिकेत तटकरे यांनी देखील भाजपा आणि शिवसेनेच्या कटू आठवणी सांगितल्या. या आधी काय झाले याचा विचार करु नका, आता पुढे काय करायचे आहे, याचा विचार करा, असे अनिकेत तटकरे हे कार्यकर्त्यांचा मनावर बिंबवत होते. महायुतीमधील कार्यकर्ते, नेत्यांनी आपापल्या वक्तव्यात आणि वागणूकीत सुधारण करण्याचे आवाहन करत त्यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसे दुर ठेवले होते. याची आठवण देखील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

आमदार दळवी यांच्याकडून गेल्या काही कालावधीमध्ये काही डावे-उजवे झाले असेल, ते आता विसरण्याची वेळ आली असल्याचे सतिश धारप यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी आपण पुन्हा एकत्र आलो पाहीजे. राजकारणात समज गैरसमज होतच असतात, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

वृंदावनमध्ये शिजतेय राजकीय डाळ
महायुतीमधील कार्यकर्त्यांना समन्वयाचे ज्ञान पाजण्यात आमदार महेंद्र दळवी मशगुल होते. तेव्हा वृदांवन येथील सतिश धारप यांच्या घरामध्ये अनिकेत तटकरे, हर्षल पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते आणि स्वतः सतिश धारप हे कोणती व्यूहरचना आखण्यात दंग होते. याचा थांगपत्ता शिवसेना शिंदे गटाला लागला नाही. आमदार दळवी यांना चर्चेत स्थान न देता कोणती राजकीय डाळ शिजत होती. याची कुजबूज महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरु असल्याचे कार्यक्रमस्थळी ऐकू आले. त्यामुळे समन्वय साधणार्‍यांमध्येच कसलाच समन्वय नसल्याचे त्या निमित्ताने अधोरखित झाले.
भाजपाला उरणमधील बंडखोरीचा विसर
अलिबाग विधानसभेमध्ये महायुतीमधील शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांचे आव्हान राहणार आहे. भोईर हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने भाजपा नेत्यांची केवीलवाणी स्थिती झाली आहे. बंडखोरीची विचारधारा भाजपाला मान्य नाही, असे धारप यांना येथे सांगावे लागले. पंरतु, 2019 च्या निवडणूकीत उरणमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेले महेश बालदी यांच्या पराक्रमाचा विसर धारप यांना पडल्याचे त्या निमीत्ताने दिसून आले. भाजपा भोईर यांना आतून मदत करुन महेंद्र दळवी यांचा काटा तर काढणार नाही ना, अशी भीती शिवेसेना शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना सतावत असावी.
Exit mobile version