यु डोन्ट टॉक! सोनियांनी स्मृतींना सुनावले; सुप्रिया सुळेंची मध्यस्थी

राष्ट्रपतींचा अवमानकारक उल्लेख;काँग्रेस-भाजपची संसदेत खडाजंगी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी केल्याच्या मुद्यावरुन लोकसभेत गुरुवारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी याबाबतचे आक्षेपार्ह विधान केले. त्याचे पडसाद संसदेबाहेरही उमटले. लोकसभेत सोनिया गांधी यांनी तर विंगेत जात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘यु डोन्ट टॉक’,असा दमही भरला.

काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी एका मुलाखतीत हा उल्लेख केला होता. त्यावरुन सत्ताधारी भाजपने संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. वातावरण इतके पेटले की, थेट सोनिया गांधींच्याच माफीची मागणी भाजपने केली. स्मृती इराणी यांनी थेट गांधींवर हल्लाबोल केला. या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ झाल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही एक नाट्य घडलं. सोनिया गांधी यांनी एक अनोखं पाऊल उचलत निदर्शने करणार्‍या भाजप खासदारांच्या बाजूला त्या गेल्या. तिथे रमा देवी यांना त्यांनी विचारलं की, माझं नाव यात का ओढलं जातंय? शेजारीच स्मृती इराणीही होत्या. त्यांनी त्यात बोलायचा प्रयत्न केला. त्यावर सोनिया गांधींनी डोन्ट टॉक टू मी असं म्हटल्याचा भाजपचा दावा आहे.

संसदेत गेल्या आठवडाभरापासून महागाई, बेरोजगारीवरुन विरोधकांची निदर्शने सुरु आहेत. त्याला सत्ताधार्‍यांनी दाद दिली नाही. पण गुरुवारी अधीर रंजन चौधरी यांनी आयती संधी उपलब्ध करुन दिल्यानंतर सत्ताधारी विरोधकांवरच आक्रमक झाले. सकाळपासूनच त्याची झलक पाहायला मिळत होती. भाजपच्या एससी, एसटी वर्गातल्या खासदारांनाही या मुद्यावरुन आक्रमक राहण्याचे आदेश दिले गेले होते. सभागृहात जातानाच माफीच्या मागणीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना छेडलं असता त्यांनी यावर अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं म्हटलं होते.

सुप्रियांची मध्यस्थी
राष्ट्रवादी खा.सुप्रिया सुळे, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, भाजपाचे प्रल्हाद जोशी आणि अर्जुन मेघवाल यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसच्या खासदार गीता कोरा आणि ज्योत्स्ना महंत यांनी स्मृती इराणी तसेच भाजपाच्या काही पुरुष खासदारांनी सोनिया गांधींशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version