काँग्रेसचे रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांचे प्रतिपादन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मतांची विभागणी, पैशांचा वापर आणि प्रसिद्धीच्या जोरावर भाजपचे पूर्ण देशात 1300 आमदार निवडून आले आहेत. मात्र देशात आजही भाजप खेरीज इतर पक्षांचे सुमारे दोन हजार आमदार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी निर्धार व परिश्रम केले तर भाजपला मात देणे अशक्य नाही, असे मत काँग्रेसचे रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. सभासद नोंदणी अभियानाच्या निमित्ताने ते अलिबागच्या काँग्रेस भवन येथे बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी कोणतेही भरीव काम केले नाही, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या आहेत. स्वातंत्र्यापूर्वी भारतात सुई सुद्धा बनत नव्हती, त्या पार्श्वभूमीवर देशाच्या आजच्या प्रगतीत काँग्रेसचाच मोठा वाटा आहे. पण आता परिस्थिती बदलल्याने पक्षकार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. कार्यकर्ते हाच पक्षाचा पाया असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी व काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था यावी यासाठी अथक प्रयत्न करणे जरुरी असल्याचे बरगे म्हणाले.
भाजपला पाशवी बहुमत मिळत असल्याने काँग्रेसची समर्थ विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी वाढली आहे. गेली काहीवर्षे ती जबाबदारी राहुल गांधी यांनी संसदेत व्यवस्थित पार पाडली आहे. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी जे मार्केटिंग व अर्थकारण लागते त्यात काँग्रेस कमी पडायला लागली आहे. भाजपला सत्तेवरून घालविण्यासाठी नेत्या-कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन लोकांची कामे केली पाहिजेत. पण सध्या प्रसिद्धीचा जमाना असल्याने त्या कामांची प्रसिद्धीही केली पाहिजे. समाजमाध्यांचा जनतेवर मोठा प्रभाव पडत असल्याने अनेक निवडणुकामध्ये सिद्ध झाले आहे.तेथेही आपले विचार मांडले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
आजही देशातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आदी राज्यांमध्ये काँग्रेसला मोठा जनाधार आहे. त्याचे प्रतिबिंब तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही उमटले आहे. आजही अनेक राज्यात नंबर दोनचा पक्ष म्हणून काँग्रेसच आहे. आज देशात भाजपचे एकूण 1373 आमदार असून एकट्या काँग्रेसचे 692 आमदार आहेत. भाजपखेरीज इतर सर्व प्रमुख पक्षांचे मिळून सुमारे दोन हजार आमदार आहेत. मात्र मतांच्या फाटाफुटीमुळे भाजपचे जास्त आमदार निवडून येतात, हे आताच्या उत्तर प्रदेश निवडणुकीतही दिसून आले. जय, पराजय हा प्रक्रियेचा भाग आहे. त्या मुळे एका पराभवाने खचून न जाता स्थानिक पातळीवरही गटा तटात विभागलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. मला पूर्ण खात्री आहे 2024 च्या निवडणुकीत राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसपक्ष उभारी घेईल, असा विश्वासही या वेळी बरगे यांनी व्यक्त केला.
यावेळी सभासद नोंदणी अभियान निरीक्षक रवींद्र परटोले, रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील थळे, प्रदेश निरीक्षक बरगे साहेब व प्रदेश निरीक्षक रविंद्र परटोले व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, प्रदेश महिला आघाडीच्या सचिव मोनिका पाटील, अलिबाग तालुका महिला काँग्रेसच्या अधक्षा सुजाता पाटील, नयना घरत आदी पदाधिकारी हजर होते. प्रस्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मगर यांनी केले तर आभार नवनिर्वाचित उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी मांडले. कार्यक्रमात डिजिटल सभासद नोंदणीकर्ते याना निरीक्षकांनी मार्गदर्शन केले.
भाजपला मात देणे शक्य
