बोरीतील सभेतूतन महाविकास आघाडीचा आरोप
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेतील प्रभाग 3 व 4 या शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्याकडे सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक पाठ फिरवून विकासकामे खुंटीवर टांगून ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीने बोरी गावातील जाहीर सभेत केला. रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांकडे गेल्या अनेक वर्षांपासून ढिम्म दुर्लक्ष केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही भाजपपुरस्कृत अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने “विकासाला वाळीत टाकणार कोण?” असा सवाल नागरिकांनी सभागृहातून उपस्थित केला.
बोरी गावातील महाविकास आघाडीच्या सभेला उसळलेल्या जनसागराने निवडणूक वातावरण ढवळून निघाले. गर्दीचा प्रचंड लोंढा पाहता अतुल ठाकूर आणि प्रमिला पवार यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रभाग 3-4 मधील नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपला कडवट धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे सभेतील वातावरणावरून प्रकर्षाने दिसून आले.
सत्तेत असूनही भाजपच्या नगरसेवकाचा या प्रभागांत वारंवार पराभव होत असल्याने त्यांनी विकासकामांना जाणीवपूर्वक ब्रेक लावल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर अचानक “विकास करू” असे सांगणारे उमेदवार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका करण्यात आली. कधीच न दिसणारे, सामाजिक कामात शून्य सहभाग असलेले उमेदवार लादण्याचा भाजपचा प्रयत्न सुज्ञ मतदारांना रुचत नाही, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.
सभेत अतुल ठाकूर यांच्या आजवर केलेल्या विकासकामांची पुस्तिका सादर करण्यात आली. त्यात रस्ते, पाणीपुरवठा, नाली, स्वच्छता, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवणे, तातडीची कामे त्वरित मार्गी लावणे अशा त्यांच्या उल्लेखनीय कामांचा आढावा देण्यात आला. ही पुस्तिका पाहताच विरोधकांची बोलती बंद झाल्याचे दृश्य सभागृहात पाहायला मिळाले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लोकसेवा करणारे संतोष पवार यांच्या सामाजिक वारशातून उमेदवारी मिळालेल्या प्रमिला पवार यांनीही विकासासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने भावना घाणेकर यांची निवड केली आहे. सिडको, जेएनपीटी, नगरपालिका आणि प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात नेहमी अग्रस्थानी राहणाऱ्या या रणरागिणींची निवड जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली. तर भाजपने स्वतःच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलून, कधीच राजकारणात नसलेल्या व्यक्तीच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याची टीका सभेत झाली.
सभेदरम्यान माजी आमदार मनोहर भोईर, नरेश रहालकर, गोपाळ पाटील, भूषण पाटील, गणेश शिंदे आदींनी प्रभाग 3 व 4 च्या जाणीवपूर्वक झालेल्या विकासदुर्लक्षावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अतुल ठाकूर यांनी आपल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला, तर प्रमिला पवार यांनी समाजकार्यासाठी स्वतःला संपूर्णपणे वाहून घेण्याची तयारी दर्शवली. सभेत अतुल ठाकूर यांनी आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा पर्दाफाश केला. नगरपालिकेने ज्या ठिकाणी फायर स्टेशनसाठी आरक्षित जागा ठेवली आहे, त्या जागेवरच आज कचरा साठवला जात आहे. या कचऱ्यावर गुरेढोरे तुडवून तो अस्ताव्यस्त करतात आणि त्याची दुर्गंधी परिसरातील नागरिक व प्रवाशांना सहन करावी लागत आहे. नगरपालिकेच्या या ढिसाळ आणि बेपर्वा कारभारामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती त्यांनी सभेत दिली. उरणच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे जाहीर करत, नगराध्यक्ष पदासाठी भावना घाणेकर आणि सर्व प्रभागातील आघाडीच्या उमेदवारांना मशाल, तुतारी व हाताचा पंजा या निशाणीवर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन सभेतून करण्यात आले.







