उरण नगरपरिषदेच्या विकासाआड भाजप

महिला म्हणून मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा नगराध्यक्षा घाणेकर यांचा गंभीर आरोप

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण नगरपरिषदेच्या बजेट नंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर भाजपने शहरवासियांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असलेले विकासकामांचे 10 पैकी 7 ठरावांना विरोध करून नामंजूर केले आहेत. यामुळे भाजपला उरण शहराच्या विकासाबाबत काहीएक सोयर-सुतक उरले नसल्याचा आरोप नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. तसेच मुख्याधिकारी समीर जाधव हे शहरातील समस्या, विकासकामांबाबत सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसून, महिला नगराध्यक्ष म्हणून मानसिक खच्चीकरण करीत असल्याचाही गंभीर आरोप नगराध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.

उरण नगरपरिषदेच्या आणि त्यानंतर पार पडलेल्या उरणमधील जि.प., पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजप आमदार महेश बालदी यांना महाविकास आघाडीने चारही मुंड्या चित केले. उरण तालुक्यात दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहिल्याने भाजपला लागोपाठ हादरे बसले आहेत. यातून भाजप अद्यापही सावरलेली दिसत नाही. याचा प्रत्यय उनपच्या लागोपाठ झालेल्या दोन्ही सर्वसाधारण बैठकीतून महाविकास आघाडी व शहरवासियांना आला आहे.

उनपच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह महाविकास आघाडीने 21 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपने 12 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे, तर बहुमत भाजपकडे अशी राजकीय स्थिती उनपमध्ये निर्माण झाली आहे. याचा राजकीय लाभ उठवत भाजपच्या 12 नगरसेवकांनी उनपच्या वार्षिक बजेटच्या सर्वसाधारण सभेलाच गैरहजर राहून महाविकास आघाडीला दणका दिला होता. तर, बुधवारी (18) आयोजित करण्यात आलेल्या उनपच्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील शहरवासियांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असलेले विकासकामांचे 10 पैकी 7 ठरावांना भाजपच्या 12 सदस्यांनी विरोध दर्शवून नामंजूर केले आहेत. यामुळे उनपच्या पुढील कामकाजाची जणू चुणूक बहुमताच्या जोरावर भाजपने महाविकास आघाडीला दाखवून दिली आहे. भाजपचे उपनगराध्यक्ष रवि भोईर यांनी नामंजूर करण्यात आलेल्या ठरावांचे समर्थन केले आहे. यापुढेही सभागृहात भाजपची अशी भूमिका कायम राहणार असल्याचेही त्यांनी माहिती देताना स्पष्ट केले.

शहरवासियांच्या विकासकामांचे मांडलेले ठराव सभागृहातील भाजप सदस्यांच्या विरोधामुळे नामंजूर झाल्याने मात्र महाविकास आघाडीमध्ये संतापाचे वातावरण आहे.सर्वसाधारण सभेनंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी लागलीच पत्रकारांशी संवाद साधला.उरणवासियांच्या विकासकामांना विरोध करणाऱ्या भाजपच्या 12 सदस्य व नेतृत्वावरही नगराध्यक्षांनी घणाघाती टीका केली. मात्र, लोकहिताचे व शहरवासीयांच्या विकासकामांचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी भाजपच्या दबावाखाली असलेले मुख्याधिकारी समीर जाधव हे शहराच्या विकासकामांबाबत सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाहीत. उनपच्या सर्वच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मुख्याधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय एकही फाईल नगराध्यक्षांना देऊ नयेत अथवा चर्चा, बैठक घेऊ नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

केवळ महिला नगराध्यक्ष आहोत म्हणून मुख्याधिकारी आपले मानसिक खच्चीकरण करीत असल्याचाही गंभीर आरोपही नगराध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. मात्र, नगराध्यक्षांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत विचारणा करण्यासाठी वारंवार मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांची या आरोपांबाबतची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

Exit mobile version