आग्राव येथील मविआच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
| चौल | प्रतिनिधी |
संविधानाने दिलेले अधिकार संपवण्याचा प्रयत्न देशात सुरू असून, हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांना तडा देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या घरात दुःखाचा प्रसंग असतानाही हिंदू शोकसंस्कृतीची पर्वा न करता दबावतंत्र वापरून शपथविधी घडवून आणण्यात आला, हे हिंदू संस्कृतीला तडा देणारे उदाहरण असल्याचा दावा करत त्यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
चौल-आग्राव येथे रविवारी (दि.1) महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. यासभेला शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, बाबू मोरे, सोनाली मोरे, चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, चौल-वरंडे पंचायत समितीच्या उमेदवार अनया अमित फुंडे, रेवदंडा-नागाव पंचायत समितीचे उमेदवार राकेश वसंत म्हात्रे यांच्यासह शेकाप-महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आघाडीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचा दावा त्यांनी केला.
अजित पवार यांच्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या 40 वर्षांत आम्ही विविध सहकारी संस्था, विधिमंडळ, राज्य मध्यवर्ती बँक, मार्केटिंग फेडरेशन अशा अनेक पातळ्यांवर एकत्र काम केले. ते शब्दाला पक्के होते. टीका केली तरी सभा संपल्यावर ‘तुमचे समाधान झाले का?’ अशी आपुलकीने विचारपूस करायचे. अशा व्यक्तीच्या घरात दुःख असताना घाईघाईने शपथविधी करणे, ही कोणती संस्कृती आहे? हिंदू धर्मातील शोकसंस्कृतीचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, घरात मृत्यू झाल्यानंतर बारा-तेरा दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे. विधवा स्त्री घराबाहेर पडत नाही. मग अशा वेळी सत्ता मिळवण्यासाठी घाई का? अजित पवार युतीतून बाहेर पडणार होते, मागील पंधरा दिवसांपूर्वीपासून त्यांची भाषणे भाजविरोधातील होती, त्यामुळेच ही घाई झाली, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, नीतीमत्ता सोडून सरकार चालवले जात आहे. शपथविधी महिना-पंधरा दिवसांनी झाला असता तरी चालले असते. परंतु, सत्तेसाठी कोणतीही दया-माया ठेवलेली नाही. म्हणून अशा सरकारला बाहेर काढणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. ज्या रस्त्याची किंमत हजार रुपये आहे, त्याचे दहा हजारांचे बिल केले जाते. हा भ्रष्टाचार उखडून टाकायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर जिल्हा परिषदेत सत्ता आपलीच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरेंद्र म्हात्रे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या डोक्यावर माझा आशीर्वाद आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. आग्राव हा शेकापचा बालेकिल्ला असल्याचे सांगत यावेळी विक्रमी मताधिक्य मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेकापची चौथी पिढी आम्ही निवडणुकीत उतरवत आहोत. वकील, डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चशिक्षित तरुणांना उमेदवारी दिली आहे. आज राजकारण पैशावर चालते. फॉर्म मागे घ्यायला कोट्यवधी रुपये दिले जातात. अशा खालच्या पातळीवर राजकारण गेले आहे. परंतु, उच्चशिक्षित उमेदवार ही खऱ्या अर्थाने शेकापची ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिबाग तालुक्यातील अष्टागर परिसरातील 16 कोळीवाड्यांच्या विकासाचे नियोजन आपण केले असल्याचे सांगत त्यांनी आग्राव जेटीच्या कामाची आठवण करून दिली. चौलमध्ये शेकाप आणि शिवसेनाच आहे. शेकापची मते बदलत नाहीत, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी आमदारांना 50-50 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला. एवढे पैसे आले कुठून? तुम्हीच त्यांना कमवायला संधी दिली आहे. ज्याला विधिमंडळाचे कामकाज कळत नाही, असा आमदार तुम्ही पाठवून दिला आहे. अशा आमदाराला तुम्ही दोन वेळा निवडून दिले आहे. आता हे पाप तुम्हीच परत फिटवायचे आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, असे आवाहन शेकापसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले. आग्रावचे जे गरीब कार्यकर्ते, गरीब कोळीबांधव आहेत, ते शंभर टक्के महाविकास आघाडीबरोबर राहतील, आमचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत, ते मी जसे अबाधित ठेवलेत, तसे माझ्या कार्यकर्त्यांनीही ठेवल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मी प्रतिज्ञा केली आहे, की ज्यावेळी 79 साली मी निवडून आलो होतो, त्यावेळी आपल्या 18 पैकी 18 जागा निवडून आल्या होत्या, आता 21 पैकी 21 जागा आपल्याला खेचून आणायच्या आहेत. याठिकाणी तुम्ही शिवसेना किंवा सुरेंद्र म्हात्रे यांना नाही, तर जयंत पाटील यांना मत देत आहात, असे समजून मतदान करा, असे आवाहन शेवटी त्यांनी शेकाप-महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.








