गुजरातमध्ये भाजपचे कमळ;हिमाचलमध्ये काँग्रेसला साथ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा सत्ता संपादित करण्यात भाजपला यश आले आहे.तर हिमाचलमध्ये मतदारांनी भाजपला झिडकारुन काँग्रेसला साथ दिली आहे. देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये मात्र भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना भाजपने 2002 साली सर्वाधिक 127 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपलच हा विक्रम मोडीत काढला आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 182 पैकी 156 जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.मोठा गाजावाजा करुन मैदानात उतरलेल्या आप ला दुहेरी संख्याही गाठता आलेली नाही.अवघ्या पाच जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र एवढा मोठा पराभव होऊनही पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात केजरीवाल यशस्वी झाले आहेत.

भूपेंद्र पटेलच मुख्यमंत्री
दरम्यान,भाजपला घवघवीत यश संपादित करुन देणारे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व सोपविले जाणार आहे.त्यांचा शपथविधी 12 डिसेंंबरला मोदी स्टेडियमवर होणार आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह आदी उपस्थित राहणार आहेत.पटेल हे घाटलोडिया मतदार संघातून सलग दुसर्‍यांदा विजयी झालेले आहेत.

एक्झीट पोलचे अंदाज फोल
अनेक एक्झिट पोल्सनी हिमाचल प्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविला होता. या परिस्थितीत भाजप आपली केंद्रातील रसद वापरुन सहजपणे सत्तास्थापन करेल, असे म्हटले जात होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा अंदाज खरा ठरतानाही दिसत होता. परंतु, काही तासानंतर हे चित्र पालटले. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशातील एकूण 68 जागांपैकी 40 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत आहेत. भाजपला फक्त 25 जागांपर्यंत मजल मारता आली आहे. तीन जागांवर अपक्ष उमदेवार जिंकले आहेत. हिमाचल विधानसभेत बहुमताची मॅजिक फिगर 35 आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्ष सहज सत्तास्थापन करेल,असे दिसत आहे. भाजपकडून आमदार फोडाफोडीचे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आमदारांना सिमला किंवा चंदीगडमध्ये एकत्र येण्याचे सुचित केले आहे.

गुजरात
एकूण जागा -182
जाहीर निकाल 182
भाजप 156
काँग्रेस — 016
आप 005
इतर 004

हिमाचल प्रदेश
एकूण जागा – 68
जाहीर निकाल -68
काँग्रेस – 40
भाजप 25
इतर 03

Exit mobile version