भाजपचे आ. जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात

। पुणे । वृत्तसंस्था ।

नागपुरातील अधिवेशन आटोपून पुण्यातून माण इथं जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांची गाडी बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळं वेगानं असलेली गाडी पुलाचे संरक्षक असलेली ग्रील तोडून सुमारे साठ ते सत्तर फूट नदीच्या पात्रात कोसळली. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात जखमी झालेले आमदार जयकुमार गोरे यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तातडीनं पुण्यात उपचारासाठी हलविले आहे.

गाडीत असणारे त्यांचे पीए रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामती इथं तर बॉडीगार्ड जनार्दन बनसोडे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघाताचं वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिलीय.

गोरेंवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
दरम्यान, या अपघाताबाबत आमदार गोरेंच्या कार्यालयातून फेसबुक पोस्टव्दारे माहिती देण्यात आलीय की, आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण इथं अपघात झाला असून त्यातून ते सुखरूप बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. गाडीतील इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती बरी आहे. सध्या पुण्यातील रुबी हॉल इथं उपचार गोरेंवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version