भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर: सुषमा अंधारे

| मुंबई | प्रतिनिधी |

उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्याच्या निमित्ताने राजकारणाची हास्यजत्रा सुरू आहे, ती अत्यंत रंजक आहे. कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसले आहे, तर कुणी एबी फॉर्मच खाऊन टाकत आहे. तर कुणी भाजपाच्या नेत्याच्या कानशिलात लगावत आहे. हे सर्व बघितल्यानंतर एकच दिसत आहे की, भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण काँग्रेस खूप शक्तीशाली झाली आणि त्यांच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले तेव्हा काँग्रेसमधूनच अनेक पक्ष बाहेर पडले. भाजपाच्या फुटीची पहिली लक्षणे या निवडणुकीत दिसली असल्याचे शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

भाजपाच्या फुटीची लक्षणे सांगत असताना सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या देवयानी फरांदे, सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीचे उदाहरण दिले. ठिकठिकाणच्या निष्ठावंताना डावलून जुने विरुद्ध नवे, असा वाद निर्माण होत आहे, यावरून भाजपात काही आलबेल नसल्याचे दिसत आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजपाची भूक इतकी मोठी आहे की, त्यांनी खूप लोकांना घरात घेतले. आता घरात जागा करण्यासाठी ज्यांनी घर बांधले, त्यांनाच घराबाहेर काढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारी देण्यात निश्चितच अनेकांचा बळी दिला आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर अशी वेळ आली नाही. आम्ही पुण्यात 80 ते 85 जागांवर लढत आहोत. ज्याठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार होते, त्यांना मातोश्रीवर बोलवून त्यांची समजूत काढून मार्ग काढला, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे म्हणाल्या, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. वाण नाही पण गुण लागला, अशी एक म्हण याठिकाणी लागू पडते. ज्या भाजपाबरोबर अजित पवारांनी घरोबा केला आहे. त्या भाजपात सर्व प्रकारचे गुन्हेगार, तडीपार, भ्रष्टाचारी, गुंड आलेले आहेत. भाजपा आपल्याबरोबर असेल तर आपण गुन्हेगारांनाही निवडून आणू शकतो, अशी खात्री मिळाल्यामुळेच अजित पवारांनीही गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. लोकांच्या मताचा आदर न करता राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो निश्चितच निषेधार्ह आहे, अशीही टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Exit mobile version