मविका विरुद्ध भाजप संघर्ष शिगेला; फडणवीसांची दोन तास चौकशी

| मुंबई | प्रतिनिधी |
सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून गोपनीय माहिती जाहीर केल्याप्रकरणी सरकारच्यावतीने रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी दोन तास चौकशी करण्यात आली. यावरुन आता भाजपही आक्रमक झाला असून, सरकारच्या विरोधात सोमवारी नवा व्हीडीओ बॉम्ब फोडण्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी दिला आहे.

फोन टॅपिंग आणि पोलीस बदली भ्रष्टाचार प्रकरणातील गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात आली. सायबर गुन्हे शाखेचे पथक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल आले होते. डीसीपी हेमराज सिंग राजपूत, एसीपी नितीन जाधव आणि दोन पोलीस निरीक्षकांचा या पथकात समावेश होता.
फडणवीस यांची आधी पोलिस मुख्यालयात चौकशी केली जाणार होती.त्यावरुन भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा इशारा देताच पोलिसानी फडणवीस यांची सागर या सरकारी बंगल्यातच चौकशी केली.यावेळी भाजपचे बडे नेते उपस्थित होते. दरम्यान,भाजपतर्फे राज्यभरात सरकारने पाठविलेल्या नोटिसीची होळी करण्यात आली.ठिकठिकाणी आंदोलनेही केली गेली.

मी जबाबदार नेत्यासारखा वागलो
मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्यासंदर्भातील पत्र मी त्यांना दाखवलं. पेनड्राईव्ह मी कोणालाही देणार नाही. या सर्व कागदपत्रांमध्ये आयपीएस अधिकार्‍यांची नावे आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहसचिवांना नावे दिलीत. म्हणून ती माहिती सार्वजनिक केली नाही. सुरक्षिततेचा घोटाळा झाला असेल तर कोणी केला? कारण, नवाब मलिकांनी माध्यमांना ती माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी गोपनियतेचा भंग केला आहे. चौकशी करायची असेल तर मलिकांची करा. सरकारने मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीही होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे सोमवारी विधानसभेत आणखी एक व्हीडिओ बॉम्ब टाकणार आहेत. एकाच व्हीडिओ बॉम्बने सगळेजण इतके चिडीचूप झाले आहेत. मग दुसरा बॉम्ब टाकल्यावर काय होईल? दुसरा व्हीडिओ बॉम्ब आणखी शक्तिशाली आहे.

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नोटीश कशामुळे दिली? माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावं. देशात, राज्यात आपल्याकडे अशी परिस्थिती कधीच नव्हती. नोटिसा देणं, वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं वगैरे. मी पंतप्रधानांसमोर देखील त्याबाबत वक्तव्य केले ओ. प्रत्येकानं आपापलं काम करावं. जनतेनं ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे.

अजित पवार, उपमुख्यंमत्री

जबाब नोंदविणे गैर नाही
यावेळी दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय की, गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली. फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात काही गैर नाही. राज्य विभागाची गुप्त माहिती बाहेर पसरवल्याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती बाहेर कशी गेली हा विषय आहे. ही माहिती प्रसिद्ध करायची कि नाही करायची हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, चौकशी झाली म्हणून भाजपला दंगा करण्याचं काही कारण नाही. फडणवीसांना समन्स पाठवलेलं नाहीये. आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्यात आला आणि यात गैर काहीच नाही. यासंदर्भात उगाच गोंधळ करण्याची गरज नाही. त्यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. फडणवीस यांना तो डेटा कुठून मिळाला हे तपासलं जातंय.

Exit mobile version