जनतेचा आशीर्वाद मागायला नाही तर माफी मागायला यात्रा काढा- शेकाप युवा नेते निलेश थोरे

केंद्रीय मंत्र्यांच्या यात्रेचा माणगाव तालुक्यात शेकाप जाहीर निषेध करणार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. सदर जन आशीर्वाद यात्रा ही प्रत्येक तालुक्यांमध्ये रथ स्वरूपात जाणार असून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जात आहोत असे म्हणणे भाजप कार्यकर्त्यांचे आहे, परंतु मुळातच महागाईचा भस्मासुर एवढा वाढला असताना, यूपीए काळात सत्तर रुपये लिटरने असणारे पेट्रोल आज तब्बल 110 रुपये लिटरने मिळत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेला आज चिंतेचा विषय असणारा घरगुती गॅस सिलेंडर चारशे रुपयांवरून तब्बल 900 रुपयांपर्यंत महाग झालेला आहे. विजेचे दर असतील किंवा शेतीसाठी आवश्यक असणारे खत बी-बियाणे असतील शेतीची अवजारे असतील या सगळ्यांचेच दर आज गगनाला भिडलेले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागताना सांगितले होते की महागाई कमी होईल, विदेशातून काळा पैसा परत भारतात आणला जाईल. प्रत्येक नागरिकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये दिले जातील. दरवर्षी तब्बल दोन करोड रोजगार तरुणांना उपलब्ध करून दिले जातील. कृषी व उद्योग क्षेत्रात क्रांती आणली जाईल; परंतु अच्छे दिनचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहिले असून सर्वसामान्य जनतेला भाजपने खोटी आमिषे दाखवून व दिशाभूल करून जाती-धर्माचे राजकारण करून समाजात फूट पाडून मते मिळवली आहेत.

आज केंद्रातील मोदी सरकार कोरोना असेल किंवा देशांतर्गत येणार्‍या इतर अडचणी असतील सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने व जनतेचा प्रचंड भ्रमनिरास केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनतेची व मतदारांची जाहीर माफी मागितली पाहिजे. जी स्वप्न दाखवून आज आम्ही सत्तेत बसलो ती पूर्ण आम्हाला करता आली नाही व देशाला अजून अधोगतीकडे नेण्याचे पाप आमच्या हातून झाले असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात गावोगावी नियोजित असलेली जन आशीर्वाद यात्रा रद्द करून जाहीर माफी यात्रा काढायला हवी. कारण कार्यकर्ते जेव्हा जनतेचा आशीर्वाद मागायला यात्रा घेऊन जातील, तेव्हा जनता शिव्या शाप आणि तळतळाट याशिवाय दुसरं काहीही केंद्र सरकारला देणार नाही. त्यामुळे आपल्या सरकारकडून झालेल्या चुका व अपयश हे मोठ्या मनाने कबूल करायला हवे, असे वक्तव्य शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते निलेश थोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्याचप्रमाणे जनतेशी संपर्क करण्यासाठी जर यात्रा काढली असेल तर केंद्रीय मंत्र्यांनी आमचा निषेध स्वीकारून आमच्याशी चर्चा करावी, असे खुले आव्हान त्यांना शेकाप तर्फे असेल; कारण आम्ही पण याच देशाचे नागरिक आहोत. केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे साहेब हे स्वतः कोकणी माणूस असूनही कोकणावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आजवर केलेल्या अन्यायाविरोधात लढण्याऐवजी त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत फिरत आहे, हीच खरी खंत असल्याचे युवा नेते निलेश थोरे यांनी सांगितले.

माणगाव तालुक्यात व श्रीवर्धन मतदारसंघात केंद्र शासन अंतर्गत येणार्‍या सर्व योजना व विकास कामे ही पूर्णता रखडलेली असून साधा एक राष्ट्रीय महामार्ग देखील मोदी सरकार आल्यापासून तब्बल सात वर्षात पूर्ण करू शकले नाहीत. त्याच महामार्गावर आज शेकडो बळी आत्तापर्यंत गेले आहेत. खते व बी-बियाणे, शेतीची अवजारे यांचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्याच्या काळात कोणतीही ठोस उपाय योजना माणगाव तालुक्यासाठी व संपूर्ण राज्यासाठी न करता केंद्र शासन केवळ दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू मोफत देऊन आपण संसार वसवून दिल्याच्या अविर्भावात वावरत आहे. लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्यांचा कोणताही विचार न करता बँकाची हप्ते वसुली मात्र जोरात चालू आहे. लॉकडाऊन काळात संपूर्ण देशभरात वाढीव वीजबिले आली. प्रत्येक राज्यात जनतेनी विनवण्या आंदोलने केली; परंतु कोणताही दिलासा त्याठिकाणी केंद्र शासनाने दिला नाही.

आज लसीकरणाच्या बाबतीतही सावळा गोंधळ आपण सगळेच पाहत आहोत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जनतेचा आशिर्वाद नाही तर जाहीर माफी मागितली पाहिजे, असा घणाघात निलेश थोरे यांनी केला. त्याचप्रमाणे यात्रा ही माणगाव तालुक्यात आल्यास भाजप नेत्यांचा समस्त माणगावकर जनतेतर्फे जाहीर निषेध करणार असून जनतेसाठी तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर पण भाजप नेत्यांना जनतेच्या मनातील वस्तुस्थितीची जाणीव करून देणार असल्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला असुन सदर रथयात्रा ही माणगाव तालुक्यात अडवून आल्या पावली परत पाठवणार असल्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतला असल्याचे सुतोवाच युवा नेते निलेश थोरे यांनी केले आहे. त्यामुळे भाजप जनआशिर्वाद यात्रा कार्यक्रमादिवशी नक्की काय घडतंय, याची उत्सुकता व चर्चा तालुक्यात नाक्यानाक्यावर रंगली असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version