महाडमध्ये भाजप कार्यकर्ते प्रचारापासून दूर

। महाड । वार्ताहर ।

रायगड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मैदानात उतरले आहेत. मात्र, त्यांच्या महाड तालुक्यात आजवर ज्या सभा झाल्या, त्या सभांपासून किरकोळ अपवाद वगळता भाजपचे कार्यकर्ते दूरच राहात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भाजपचा उमेदवार मैदानात नसल्याची तर ही नाराजी नाही ना, अशी चर्चा त्यामुळे सुरु झाली आहे.

सुनील तटकरे यांनी महाड विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत. अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत एक सभा झाली. दुसरीकडे भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर यांनी महाड शहरात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख, वॉरियर यांची सभा घेतली. प्रवीण दरेकर यांनी घेतलेली सभा ही भाजपपुरती मर्यादित असली, तरी भाजप कार्यकर्त्यांकडून या सभेस फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चवदार तळे सभागृहाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या सभेला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहिले असले, तरी त्यांच्यासमोरच्या निम्म्याअधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. चवदार तळे परिसरातील भाजप कार्यकर्ते जरी या सभेला उपस्थित राहिले असते, तरी हे प्रांगण खच्च भरले असते अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपच्याच एका पदाधिकार्‍याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. ही प्रतिक्रिया बोलकी ठरावी.

सुनील तटकरे यांनी महाड तालुक्यात लाडवली येथे नाते जिल्हा परिषद गटाची, तर रेवतळे फाटा येथे करंजाडी जिल्हापरिषद गटाची सभा घेतली. लाडवली येथील सभेला महेश शिंदे हे भाजपचे एकमेव पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर हे महाडचे आहेत. लाडवली येथील सभेच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने ते उपस्थित राहिले. नसल्याचा खुलासा करण्यात आला. ते आणि भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत दळवी हे दोघेही आजारी असल्याने प्रचारात सहभागी होत नसल्याचे सांगितले जात आहे. ते खरे देखिल आहे. मात्र, भाजपचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, असे कोणतेही नेते लाडवली, दासगांव आणि रेवतळे फाटा येथील सुनील तटकरे यांच्या प्रसारसभांमध्ये दिसून आले नाहीत. भाजपचे कार्यकर्ते म्हणवणारांनीही या सभांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.रायगड लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनिल तटकरे यांचे नाव या उमेदवारीसाठी ताणून धरल्याने धैर्यशील पाटील यांचा पत्ता कट झाला. ती नाराजी तर या प्रचा सभांमधून दिसून येत नाही ना अशीही चर्चा त्यामुळे महाडमध्ये रंगली आहे.

Exit mobile version