। छ. संभाजीनगर । प्रतिनिधी ।
आमची ताकद अधिक असताना लोकसभेत शिंदे गटाला जागा दिली. काम करून खासदार निवडून आणला. विधानसभेतही अधिक जागा त्यांनाच. त्यावेळीही त्यांचे काम केले. आता पुन्हा पालकमंत्री त्यांचाच का? आता बस्स… आणखी किती सहन करायचे? अशा शब्दात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या नावाला तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे महायुतीत धुसफूस वाढली आहे.
महायुती सरकारने नुकतेच आपले मंत्री जाहीर केले. त्यांचे खाते वाटपही झाले. यात शहरातून भाजपचे आमदार अतुल सावे, तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण, यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आधी मंत्री शिरसाट यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असल्याचा दावा केला. यानंतर मंत्री सावे यांनीही आम्ही पालकमंत्रिपदासाठी मागणी केली असल्याचे सांगितले. यावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात युतीतच धूसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात सोमवारी सदस्य नोंदणी प्रशिक्षण वर्ग पार पडला. समोर येऊन बोलण्यास नकार देणारे पदाधिकारी येथे मात्र चांगलेच बोलते झाले. येथे बोलताना पदाधिकार्यांनी पालकमंत्रिपदासाठी मंत्री शिरसाट यांच्या नावाला विरोध दर्शविला. दुसरीकडे मंत्री सावे हेच पालकमंत्री व्हावेत, अशी जाहीर भूमिका मांडली. एवढ्यावर न थांबता, एकमताने सावे पालकमंत्री व्हावेत, असा ठराव घेतला. हा ठराव घेऊन पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत.