मतदारांवर भाजपची सक्ती

समाजाच्या मंदिरात भाजप मागतंय वचन; समाजाची सभा बोलवून मतदारांवर दबाव

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लोकशाहीत मत देणं हा नागरिकाचा स्वातंत्र्याचा हक्क असताना, भाजपकडून मात्र उसरोली मतदारसंघात मतांसाठी दबावतंत्राचा उघडपणे वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विविध समाजांच्या सभा बोलावून त्या मंचावरून कोणाच्या बाजूने मतदान करायचं याबाबत थेट आदेश दिले जात असून, मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा गंभीर ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. समाजाच्या नावाखाली राजकीय सौदेबाजी करून लोकांच्या मतस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न लोकशाही मूल्यांना तडा देणारा आहे. ॲड. महेश मोहितेंनी मतांसाठी केलेला मतदारांवर दबाव ही लाजिरवाणी बाब असून, त्यांच्याविरोधात उसरोली मतदारसंघातील मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत अपक्ष उमेदवार अंकिता पोवळे यांनी जिल्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, आता निवडणूक विभाग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

उसरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील बोर्ली मांडला गावात पंचकुम समाज मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजश्री मिसाळ, शिंदे गटाच्या ज्योती नागवेकर व भाजपकडून मनस्वी मोहिते रिंगणात आहेत. सध्या राजश्री मिसाळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या ॲड. महेश मोहितेंनी पत्नी मनस्वी मोहिते हिला मतं मिळविण्यासाठी आता गैरमार्गाचा वापर केल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवार अंकिता पोवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी बोर्ली मांडला गावात पंचकुम समाज मंदिरात समाजाची सभा बोलवण्यात आली होती. त्या सभेत उघडपणे स्वयंघोषित अध्यक्ष प्रकाश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनधिकृतपणे भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार ॲड. मनस्वी मोहिते व राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे उमेदवार संजय महाडिक यांनाच मतदान करण्याची ताकीद ग्रामस्थांना दिली. तसेच विरोधात मतदान केल्यास समाजाच्यावतीने कारवाई करण्याचे संकेत दिले. याबाबतचे सर्व पुरावे अंकिता पोवळे यांच्याकडे असून, त्यांनी याबाबत निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.

दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करा
भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी भाजपचे नेते ॲड. महेश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय महाडिक, समाजाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे तसेच विश्वस्त पदाधिकारी ग्रामस्थांकडून वचननामा घेत आहेत. त्यामुळे दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच त्यांना मतदानाच्या दिवशी दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी अंकिता पोवळे यांनी केली आहे.
आचारसंहितेचा भंग
निवडणूक आचारसंहिता लागू असताना घडणाऱ्या या प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. समाजाच्या नावाखाली मतदारांवर दबाव टाकणं, वचनबद्धतेची मागणी करणं आणि मतदानाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं हे स्पष्टपणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरत असताना, जिल्हा निवडणूक प्रशासन आणि निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेणार, हा थेट सवाल उपस्थित झाला आहे. तक्रारीनंतरही जर कारवाई होत नसेल, तर सत्ताधाऱ्यांसाठी एक नियम आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा नियम, अशी लोकशाही आहे का, असा संतप्त प्रश्न आता उसरोली मतदारसंघातील मतदार विचारत आहेत.

महेश मोहिते यांचे भाऊ पप्पू मोहिते यांनी बापूजी मंदिरात पंचकुम समाजबांधवांची बैठक लावून त्यांना कमळ आणि घड्याळाला मतदान करण्याची शपथ घालताय. आमच्या बांधवांवर मतदान करण्यासाठी हा दबाव नाही का? आम्हाला मतदान केले तर मंदिरासाठी निधी आणून मंदिर बांधून देऊ, असे आमिष निवडणुकीच्या काळात देता. ही बाब लोकशाहीला बांधा आणणारी असून, यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त, तहसीलदार, निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी यांना निवेदन दिले आहे. ज्यांच्या सांगण्यावरुन ही बैठक घेण्यात आली, ते समाजाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

-अंकिता पोवळे,
अपक्ष उमेदवार

Exit mobile version