भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा; ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी
| मुंबई | अनंत धनसरे |
“हा लढा कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा, जात-पात किंवा धर्माचा नाही; हा लढा देशाचा आणि स्वातंत्र्याचा आहे. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली देशात हुकूमशाही उभी राहात असेल, तर ती गाडून टाकणारच,” असा घणाघाती इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.4) मुंबईतील ‘गर्जना मोर्चा’ला संबोधित करताना दिला. भाजपसह भ्रष्ट निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र प्रहार करत घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणीही यावेळी करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चातून विरोधकांनी सरकार आणि निवडणूक यंत्रणेला थेट लक्ष्य केले. मेट्रो सिनेमापासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ठाकरे बंधूंनी पक्षांचे झेंडे न आणता केवळ तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मोर्चाचा परिसर तिरंगामय झाला.
मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, आ. मिलिंद नार्वेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, तरुणाई, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील मतदारांच्या संख्येवरही प्रश्न उपस्थित केला. देशातील 13 कोटी मतदार अचानक वगळले गेले, तर संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या मतदार यादीतून वगळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते, असा दावा करत उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना सवाल केला. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पूर्वीच्या नियुक्ती समितीत सरन्यायाधीशांचा समावेश होता; मात्र आता त्यांच्या जागी केंद्रातील मंत्री करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीविरोधातील आक्षेप आणि न्यायालयीन प्रक्रियेचा संदर्भ देत, ही नियुक्ती पक्षपातीपणाने झाली, असा आरोपही त्यांनी केला. हिटलरचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही इशारा दिला. सत्तेच्या जोरावर यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवणाऱ्यांनाही इतिहासाच्या न्यायाला सामोरे जावे लागते, असे सांगत त्यांनी तो क्षण आपल्या देशात उद्या आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.








