भाजपची अवस्था तडफडणार्‍या माशासारखी ; खा.सुनील तटकरे

नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार दौरा
। मंडणगड । प्रतितिनिधी ।

येथील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्य अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून विरोधकांना सतरा शून्य असे पराभूत करून गाडून टाकल्याचा निकाल द्या व विरोधकांची अनामत रक्कमसुद्धा जप्त करा. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडा. मंडणगड गरंपचायतीच्या या निवडणुकीत माजी आमदार संजय कदम व माजी आमदार सूर्यकांत दळवी या दोघांनी कायम एकत्र राहून विरोधकांचा बँड वाजवावा, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
महाविकास आघाडीच्या मंडणगड येथील प्रचार सभेत बोलताना राज्याच्या राजकारणात भाजपची अवस्था पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी झाल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपला खेड्यापाड्यात रूजवण्याचे, वाढवण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. याचा विसर या पक्षाच्या नेत्यांना पडेलला आहे. पण लक्षात ठेवा सत्तेची बेरीज कशी करायची याचा पाढा व आदर्श राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घालून दिला. केंद्राने सतत जीएसटीचा परतावा अडवण्याचे काम केले; मात्र राज्यातील विकासकामांवर कोणताही परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणवू न दिल्याने विकासाच्याबाबतीत अनेक संकटे असतानाही विकासात महाराष्ट्र अग्रेसर आहे. या प्रचार सभेस राष्ट्रवादी माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, माजी उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version