। मुंबई । प्रतिनिधी ।
भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ते मतदारांचा वापर ‘यूज अँड थ्रो’ असा करतात. त्यामुळे ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आल्यानंतर लगेचच मंदिरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केल्याचे सांगत मंदिरांना खरा धोका भाजपपासूनच असल्याचा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांवर याल तर याद राखा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या मंदिरांचे रक्षण करताना दुसर्या कोणत्याही धर्माबद्दल द्वेष पसरवण्याची गरज नाही. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अनेक मंदिरे वाचल्याचे त्या त्या ठिकाणचे पुजारी, विश्वस्त अजूनही अभिमानाने सांगतात. आता दादरचे हनुमान मंदिर वाचल्यामुळे शिवसेनेची ताकद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी वाराणसी दौर्यावर गेलो तेव्हा भाजपने कॉरिडोरच्या नावाखाली मंदिरे, प्राचीन मूर्ती तोडल्याची माहिती तेथील पुरोहिताने दिल्या आहेत. शिवसेनेमुळे दादरचे मंदिर वाचले असताना भाजपने दिवसभर केवळ नाटकं केली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, हनुमानाने ठरवले तर निवडणुका बॅलेटवर होतील आणि देशाचा खरा आवाज काय आहे हे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.