। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. शनिवारी (दि.17) होणार्या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांच्या विस्तारित बैठकीत सदस्यत्व अभियान आणि त्यानंतरच्या संघटनात्मक निवडणुकांबाबतचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. चार राज्यांमध्ये वर्षअखेरीस होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. संघटनात्मक नेतृत्वावर कोणतीही चर्चा होणार नाही, मात्र केंद्रीय नेतृत्व बैठकीअंती यासंदर्भात मोठी घोषणा करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीय अधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राज्यांचे प्रभारी व सहप्रभारी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय सभेला संबोधित करू शकतात. याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह हे देखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
या नावांची चर्चा
पक्षाध्यक्षपदासाठी आधी चर्चेत असलेल्या नावांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आदी नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र या सर्व नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मग आता कोणाची वर्णी अध्यक्षपदी लागणार याची चर्चा आता सुरू आहे. भाजपचे महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीही चर्चा आहे. कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचा विचार केला जात आहे.