धैर्यशील पाटीलांचा राजकीय बळी देण्याची भाजपाची तयारी
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अबकी बार 400 पार’ असा नारा दिला आहे. त्यानुसार त्यांनी तयारीदेखील केली आहे. महायुतीमधील घटक पक्ष काही जागांवर हक्क सांगत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) असून, तो पुन्हा त्यांच्याकडेच जाणार, असे मानले जाते. हा मतदारसंघ भाजपाला हवा आहे. परंतु, रायगडची जागा त्यांच्या हातून निसटत असल्याने ती आपल्याकडेच राहावी यासाठी भाजपा उरण पॅटर्न राबवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
रायगड लोकसभा सर करणे भाजपाला फारच अवघड आहे. उरण पॅटर्नसाठी धैर्यशील पाटील यांचा बळी देण्याची तयारी भाजपा करत असेल, तर पाटील यांनी वेळीच ओळखून यातून धडा घेतल्यास राजकीयदृष्ट्या चांगले आहे, असेदेखील बोलले जाते. इंडिया आघाडीने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे, मात्र महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार सुनील तटकरे की भाजपाचे धैर्यशील पाटील हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्यापही या जागेसाठी संघर्ष सुरु आहे.
इंडिया आघाडी अनंत गीते यांच्या प्रचाराला लागली असताना, महायुतीमध्ये मात्र बैठकांचे सत्रच सुरु आहे. शेवटच्या श्वासापर्यंत रायगडची जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे 2019 साली विजयी झाले होते. नियमानुसार ही जागा त्यांच्याकडेच जाते. परंतु, भाजपाने राजकीय डावपेचाचा भाग म्हणून माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हाती कमळ दिले. रायगडची जागा आपल्याला लढवण्यास मिळेल आणि आपण मोदी लाटेवर (ओसरलेल्या) निवडून येऊ, असे स्वप्न सध्या धैर्यशील पाटील बघत असावेत. यासाठी त्यांनी तयारीदेखील केली होती. तटकरे यांनी या जागेवरचा दावा न सोडल्याने भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे.
भाजपाच्या व्यूहरचनाकारांना कदाचित असे वाटत असेल की, आपणच विजयी होऊ. मात्र, शेकापला सोबत घेतल्याशिवाय विजय फारच अवघड आहे, याचा विसर त्यांना पडला असावा. भाजपाच्या ‘प्लॅन बी’नुसार रायगड लोकसभेसाठी उरण पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जाते. त्यानुसार धैर्यशील पाटील यांना अपक्ष उभे करुन त्यांना पाठिंबा द्यायचा, असे गणित आखले जात आहे. पुन्हा तोच प्रश्न येतो, की शेकाप आणि काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विजयी पताका फडकवणे सोपे नाही. शेकाप, काँग्रेस सध्या इंडिया आघाडीमध्ये आहे. त्याचप्रमाणे भाजपावर मुस्लीम, एसी, एसटी आणि मराठा समाज नाराज आहे. याचा फायदा हा इंडिया आघाडीच्या उमेदवाराला होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तटकरे असो, पाटील असो अथवा अन्य कोणी असो. रायगड लोकसभा सर करणे भाजपाला फारच अवघड आहे. उरण पॅटर्नसाठी धैर्यशील पाटील यांचा राजकीय बळी देण्याची तयारी भाजपा करत असेल, तर पाटील यांनी वेळीच ओळखून यातून धडा घेणे गरजेचे आहे.
काय आहे उरण पॅटर्न? 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती झाली होती. सदरची जागा भाजपाला हवी होती. मात्र, नियमानुसार ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजी पसरली होती. भाजपाचे महेश बालदी हे इच्छुक होते, पण शिवसेनेचे मनोहर भोईर यांना उमेदवारी मिळाली. बालदी यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले. भाजपाने युती धर्म पाळला नाही. त्यांनी सढळ हस्ते बालदी यांना मदत केल्याने बालदी हे 74 हजार 549 मतांनी विजयी झाले, हे उघड सत्य आहे. मनोहर भोईर यांना 68 हजार 139, तर शेकापचे विवेक पाटील यांना 61 हजार 601 मते मिळाली होती.
रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. महायुतीमधील अन्य घटक पक्षाचा उमेदवार निश्चित झाल्यास त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. रायगड लोकसभेसाठी उरण पॅटर्नची पुनरावृत्ती होणार नाही.
सतीश धारप,
अध्यक्ष, रायगड लोकसभा मतदारसंघ