काळी जादू 

महागाई आणि दडपशाहीच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसने देशभर आंदोलन केले. यावेळी राहुल, प्रियांका यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी काळे कपडे घातले होते. देशात महागाई नाहीच आहे, अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे खरे तर काँग्रेसचा स्टंट असे म्हणून भाजपवाल्यांनी आंदोलनाला उडवून लावायला हवे होते. पण बहुदा आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहून ते भांबावले असावेत. त्यांनी नेहमीच्या सवयीने प्रभू श्रीरामाला मदतीला बोलावले. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याच्या वर्धापनदिनी झालेल्या या आंदोलनात मुद्दाम काळे कपडे घालून काँग्रेसने राममंदिराला असलेला विरोधच अप्रत्यक्षपणे व्यक्त केला असे अजब तर्कट गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लढवले. तशा मुलाखती मिडियाला दिल्या. या तर्कटावर विश्‍वास ठेवणारे भक्त या देशात असतील तर आपला सुबुध्दपणा आणि लोकशाही धोक्यात आहे असे म्हणावे लागेल. या तर्कटाला बादरायण संबंध म्हणतात आणि भाजपच्या आवडत्या संस्कृत भाषेमध्ये याच्यावर चांगला श्‍लोकही आहे. तुमच्या अंगणात बोरीचे झाड आहे आणि आमच्या बैलगाडीचे चाक हेदेखील बोरीचे आहे, म्हणजे आपण नातेवाईक झालो असा गमतीशीर संबंध त्या श्‍लोकात जोडलेला आहे. काँग्रेस मुसलमानांचे तुष्टीकरण करते असा आरोप करण्यासाठी भाजपने इतक्या खालच्या पातळीवर उतरावे हे वाईट आहे. भाजपकडे आज केंद्रात व अनेक राज्यात मजबूत सरकारे आहेत. जिथे ते नाही तिथे इडी वगैरे मार्गाने ते आणता येते हे महाराष्ट्रात दिसले आहेच. झारखंडमधल्या काँग्रेस आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन फोडण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आहे. या आमदारांना रोख रकमेसह बंगाल पोलिसांनी पकडल्याने बनाव उघडकीस आला. बंगालसारख्या राज्यात तृणमूलचे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्यासोबतचे संबंध ताणले गेले असून तेथेही फोडाफोडीची तयारी चालू आहे. राष्ट्रपती मूर्मूंच्या स्वागतासाठी आणि कोविंद यांच्या निरोपासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमांना हजर न राहून नीतिशकुमार यांनी नाराजी दाखवून दिली होती. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेले आहेत. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांना केंद्रीय योजनांची अंमलबजावणी नीट होत नसल्याच्या मुद्द्यावरून घेरलेले असून ते सरकारही आपला कार्यकाळ पूर्ण करील की नाही याविषयी शंका आहे. थोडक्यात या भारतवर्षामध्ये भाजपला खराखुरा प्रतिस्पर्धी उरलेला नाही. तरीही त्यांना निव्वळ काळ्या कपड्यांची दहशत वाटावी हे अर्थपूर्ण आहे. पुराणातल्या परीक्षित राजाला डसणारा साप शेवटी अळीतून निघाला ही गोष्ट भाजप नेत्यांना ठाऊकच नव्हे तर पक्की आत्मसात आहे असा त्यांचा अर्थ आहे. काळ्या कपड्यांबाबतचा मोदी सरकारचा हा दुस्वास आजचा नाही. मोदी किंवा शहा यांच्या सभांमध्ये काळे कपडे घालून येण्यास परवानगी दिली जात नाही. ब्रिटिशांना खादी आणि खादीधारी यांची भीती वाटत असे. पण स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षातील प्रचंड बहुमताच्या सरकारला आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला काळ्या कपड्यांनी धडकी भरावी हे मजेशीर आहे. पण याचा गंभीर अर्थ असाही आहे की, काँग्रेसच्या या आंदोलनाने भाजपच्या नेमक्या दुखर्‍या नसेवर बोट ठेवले आहे. पेट्रोल, गॅस, खाद्यतेल, अन्नधान्य या सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये गेल्या एक-दीड वर्षात कमालीची भाववाढ झाली आहे. चार कोटी लोकांकडे पैसे नसल्याने उज्वला गॅस योजनेत एकदा मिळालेला सिलेंडर पुन्हा भरलाच गेलेला नाही. गरिबांना फुकट धान्य देणे सरकारला आता अवघड आहे तर गरिबांना ते बाजारातून खरेदी करणे अशक्य आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आता वर येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पेट्रोल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यतेले, डाळी, खते, यंत्रसामग्री अशा अनंत वस्तूंसाठी मोजावे लागणारे परकीय चलन कायमचे महाग होऊन बसले आहे. याचा परिणाम देशातल्या गरिबांवर होणार आहे. या स्थितीत, परिस्थितीला सामोरे जाणं हे मोदी सरकारकडून अपेक्षित आहे. कोणीतरी काळी करणी करतो आहे अशा सबबी सांगणं नव्हे.

Exit mobile version