घरगुती गॅस सिलिंडरचा पनवेलमध्ये काळाबाजार

1102 रुपयांचा सिलिंडर 1400 ते 1500 रुपयांना
पुरवठा अधिकारी आणि गॅस कंपनीचे दुर्लक्ष

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. किराणा विक्री करणार्‍या दुकानातून खुलेआम सुरु असलेल्या या काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या 1102 रुपये या सरकारी दराप्रमाणे मिळणारे घरगुती सिलेंडर 1400 ते ते 1500 रुपयांना विकले जात आहेत. घरगुती सिलिंडर घेण्याकरिता गॅस कंपन्यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय ग्राहकांना एजन्सीकडून सिलिंडर दिला जात नाही. तशा स्पष्ट सूचना देखील एजन्सीच्या बाहेर लावलेल्या आहेत. मात्र या सूचना फक्त घरगुती गॅस धारकांसाठीच असल्याचे चित्र सध्या पनवेल परिसरातील दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे.

परिसरातील गावांमध्ये असलेली भांड्यांची दुकाने किराणा मालाच्या दुकानाबाहेर बिनदिक्कत विकल्या जात असलेल्या या गॅस सिलेंडरमुळे गॅस वितरण एजन्सी च्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपास्थित करण्यात येत आहेत. त्याच सोबत परिसरातील हॉटेल, चायनीज सेंटर, स्वीट होमच्या दुकाणात देखील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. घरगुती गॅसधारकांना दुय्यम वागणूक आणि काळ्याबाजाराने सिलिंडर घेणार्‍यांना विनाबुकिंग तत्पर सेवा गॅस एजन्सी देत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून होत होत्या; मात्र पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


एमआयडीसी परिसरात विक्री
तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहती लगची गावे तसेच शहरी भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग भाड्याच्या खोलीत राहतो त्यांच्या कडे असलेल्या अपुर्‍या कागदपत्रांमुळे त्यांना परिसरातील गॅस एजन्सीत त्यांना नोंदणी करता येत नाही याचाच फायदा घेत काळा बाजार करणारे जास्त दरात आशा ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध करून देतात.

मिनी सिलिंडरही उपलब्ध
गरजू ग्राहकांसाठी बाजारात सध्या मिनी सिलिंडर उपलब्ध आहेत. 350 ते 600 रुपये दरात उपलब्ध होत आहेत. या सिलिंडरची क्षमता कमी असल्याने हे केवळ काही दिवसच वापरता येतात. परिणामी आर्थिक नुकसान जास्त होत असल्याने ग्राहक जादा दराने काळ्या बाजारातून सिलिंडर खरेदीला पसंती देतात.

पनवेल परिसरात 12 एजन्सीकडून घरगुती गॅस पुरवठा करण्यात येतो. यामुळे ऑनलाईन बुकिंग शिवाय कोणालाही घरगुती गॅस सिलिंडर पुरवला जात नाही. तरीही जर कोणी काळ्या बाजारात वक्री करतोय अस निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. – प्रदीप कांबळे. पुरवठा अधिकारी. तहसील विभाग.

Exit mobile version