शार्लोट लेकच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : खेडेकर

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेक संवर्धन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम निविदेप्रमाणे पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी माथेरानचे माजी नगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख मनोज खेडकर यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून शार्लोट लेक संवर्धनाचे काम सुरू आहे. निविदेनुसार तलावातील सुमारे 2 हजार ट्रक गाळ काढून तो दोन किलोमीटर अंतरावर वाहून नेणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात अत्यल्प गाळ काढण्यात आला असून, बहुतांश गाळ तलावातच असल्याचा दावा खेडकर यांनी केला आहे.

तलावातील गाळ भविष्यात माथेरानमधील पारंपरिक लाल मातीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपयोगी पडू शकतो. त्यामुळे मौल्यवान माती नदीत सोडण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने साठवून ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, शार्लोट लेकमधील गाळ नदीत वाहून गेल्यास मोरबे धरणाच्या जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनोज खेडकर यांनी केली आहे. निविदेतील अटींचे पालन न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Exit mobile version