एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडहल्ला

जेएनपीटी | वार्ताहर |
अकरावी, बारावीत असताना झालेल्या तोंडओळखीनेच एकतर्फी प्रेम करणार्‍या एका मजनूने आपल्या त्या जुन्या मैत्रिणीला जबरदस्तीने गाडीत कोंबून जेएनपीटी बंदराच्या वसाहतीतील सुनसान ठिकाणी नेऊन हाताबुक्क्यांनी व ब्लेडने वार केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून कथित मजनूच्या विरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी वीर वाजेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बोरी गावातील एका युवकाने फोन करून कॉलेजच्या बाहेर बोलावली. तेथील घुरबादेवी मंदिराजवळ ती आली असता त्याने त्याच्या गाडीत त्या मुलीला जबरदस्तीने कोंबून तिला बाजूलाच असलेल्या जेएनपीटी वसाहतीतील निर्जनस्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तनही संबंधित युवकाने केले. तसेच त्याच्याजवळील धारदार ब्लेडने तिच्या हाताच्या अंगठ्याला वारा केल्याची फिर्याद संबंधित कॉलेज युवतीने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. उरण तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे तर उडाले नाहीत ना, असा सवाल या ठिकाणी विचारला जात असून, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि उरण पनवेल विभागाचे पोलीस उपायुक्त याबाबत लक्ष घालणार का, असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.

Exit mobile version