माथेफिरुने वैयक्तिक भांडणातून कृत्य केल्याची माहिती
। बीड । वृत्तसंस्था ।
मागील महिन्यांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांनी चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणनंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच आता बीडमध्ये एका प्रार्थना स्थळावर स्फोट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थना स्थळात स्फोट करण्यात आला. या स्फोटात प्रार्थनास्थळाची फरशी फुटल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या अर्धामसला गावातील एका प्रार्थना स्थळावर माथेफिरूकडून स्फोट करण्यात आला. विहिरीमध्ये खोदकामासाठी आणलेल्या जिलेटीनच्या स्टिक्सचा वापर करत स्फोटाचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
दोन जण पोलिसांच्या ताब्यात
वैयक्तिक भांडणातून माथेफिरूने स्फोट केला असून सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. तर प्रार्थनास्थळाची फरशी फुटली आहे. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक?
याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत म्हणाले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे.