। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात हिंदू नववर्षाचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार घराघरात रांगोळ्या काढून, पाठ मांडून सुवासिनींनी गुढीचे पूजन केले. गोड मिष्टान्न बनवून गुढीस नैवैद्य देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या. दोन दिवसांपासूनच अनेकांनी बांबूची गुढी आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. बाजारातही 50 ते 100 रुपयांना गुढ्या विकत मिळत होत्या. सणानिमिताने झेंडूची मोठ्या प्रमाणात मागणी होती. बाजारपेठेत खरेदीचा या निमित्ताने उत्साह होता. झेंडूच्या तयार मालानाही मोठ्या प्रमाणात मागणी होती.
गुढीपाडवा व चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणूनही या दिवसाला आगळे वेगळे स्थान आहे. या गुढीपाडव्या बरोबरच श्री शालिवाहन शके 1947, विश्वावसू संवत्सराचा प्रारंभ झाला आहे. समाजमाध्यमावरही यानिमिताने एकमेकांना दोन दिवसापासूनच शुभेच्छा दिल्या घेतल्या जात होत्या. माणगाव तालुक्यातील काही गावात गुराखीही जंगलात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करतात. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात गुढी पाडवा साजरा करण्यात आला.