चित्रलेखा पाटील यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
| चणेरा | प्रतिनिधी |
गोवर्धन कांडणेकर यांच्या साथीने हिराजी कांडणेकर यांनी महादेवखारमध्ये शेकापची ताकद वाढवली. ग्रामपंचायत निवडून आणण्यात त्यांचे योगदान मोठे होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर झटत काम केले. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच शेकाप आजही रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ताकदीने उभा आहे, असे गौरवोद्गार शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी काढून हिरजी कांडणेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महादेवखार गावातील ज्येष्ठ समाजसेवक आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते हिराजी नथू कांडणेकर (वस्ताद) यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या. यावेळी परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिराजी कांडणेकर यांनी ग्रामविकासासाठी आयुष्यभर कार्य करत महाळुंगे ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडा फडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. संघटन कौशल्य, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि गावाच्या विकासासाठी असलेली तळमळ यामुळे ते ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते.
यावेळी ॲड. रोशन पाटील यांनी आपल्या मनोगतातून हिराजी दादांच्या कार्याचा गौरव करत, आरोप-प्रत्यारोप हे राजकारणात होतच राहतात; मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गावाच्या विकासासाठी संघर्ष करणारे योद्धा म्हणजे हिराजी दादा, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेला शेकाप तालुका चिटणीस शिवराम महाबळे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंकरराव म्हसकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ गंभे, व्हा. चेअरमन विकास भायतांडेल, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, मजूर फेडरेशनचे हेमंत ठाकूर, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, सरपंच संकेत जोशी, नारायण गायकर, विनायक धामणे, पांडुरंग ठाकूर, राज जोशी, महादेव शाबासकर, मनोहर वारगे, अमित कांबळे, चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हिराजी कांडणेकर यांच्या निधनाने महादेवखार गावाने एक निष्ठावान समाजसेवक, संघटक आणि ग्रामविकासासाठी आयुष्य वेचणारे नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.






