। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका खासगी कंपनीमध्ये मंगळवारी (दि.06) पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावी श्री जी ब्लॉक या नावाच्या खासगी कंपनीत सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचे काम केले जाते. सोमवारी रात्री कंपनीत विटा बनवण्याचे काम चालू होते. त्यामुळे काही कामगार रात्रपाळीवर होते. दरम्यान, मंगळवारी (दि.06) पहाटे तीनच्या सुमारास काम सुरु असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात कंपनीला आग लागली आणि टिन शेड खाली कोसळले.
स्थानिकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र, या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.