खारगावखुर्द गावाला ब्लास्टिंगचा धोका

अनेक घरांना गेले तडे; पर्यायी रस्त्याचे बांधकाम थांबविण्याची मागणी

। म्हसळा । वार्ताहर ।

दिघी-पुणे राज्य मार्ग एफ 0371 या नवीन मार्गासाठी म्हसळा तालुक्यातील सकलप खारगावखुर्द गावाच्या अगदी 50 ते 100 मीटर अंतरावरच दिघी-पुणे मार्गाच्या बांधकामाचे ब्लास्टिंगचे काम चालू आहे. रस्त्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीला कोणतीच कल्पना न देता अचानक ब्लास्टिंग केल्याने दरडग्रस्त सकलप खारगावखुर्द गावाला जोरदार हादरे बसले असून अनेक घरांना तडे गेले आहेत. याची तक्रार ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने तहसीलदार समीर घारे यांना देऊन ब्लास्टिंगचे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.

यावेळी महादेव पाटील, शेखर खोत, पांडुरंग मांदाडकर, कानु लोनशिकर, चंद्रकांत कांबळे, अरविंद कांबळे, तुकाराम खोत, योगेश मेंदाडकर, विजय लोणशिकर, साईराज कांबळे, अनंत म्हात्रे, यशवंत मेंदाडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

निवेदनात ग्रामस्थांनी खारगावखुर्द सकलपमधील काही घरे गावाशेजारील डोंगराच्या पायथ्याशी लागून वसलेली आहेत. आधीच येथील डोंगरांच्या दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असताना नव्याने विकसित होत असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग तयार करताना कोणतीच कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे ब्लास्ट केले असल्याने घरांना आणि लगतच असलेल्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाक्यांना धोका निर्माण झाला आहे. तरी रस्ता विकासकाने तातडीने काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने संयुक्तपणे केली आहे.

तहसीलदार घारे यांनी याबाबत पाहणी करून तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन देत नायब तहसीलदार गणेश तेलंगे आणि महसूल अधिकारी यांना कारवाही करण्याबाबत सांगितले आहे.

Exit mobile version