‘महाराष्ट्रात पक्ष फोडायला मोदींचाच आशिर्वाद’

| सातारा | प्रतिनिधी |

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ”महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झाल आहे. तसंच हा राजनैतिक भ्रष्टाचार आहे,” असा त्यांनी आरोप केला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ”हा भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे. एक अर्थिक भ्रष्टाचार आहे. हा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पुढं आला आहे. पैसे दिले की नंतर कंत्राट मिळते. सीबीआय, ईडींची छापेमारी झाली की चार आठ दिवसात पैसे जमा होतात. त्यानंतर छापे बंद होतात. दुसरा भ्रष्टाचार हा वैचारिक, राजनैतिक आहे. हा भ्रष्टाचार सरकार पाडण्यावेळी झाला. अशा राजनैतिक भ्रष्टाचारामुळं यापुढं कुठलंच निवडून आलेलं सरकार टिकू शकणार नाही”, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

”पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यात अपयश आले आहे. त्यामुळं महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोदी सरकारला शेती विधेयकं मागे घ्यावी लागली. त्यामुळं सरकारनं धोरणात कांदा, गहू, भात, साखरेवर निर्यातबंदी आणली. दर वाढायला लागले की बाहेरून माल आयात करायचा आणि दर पाडायचे. हे का चाललंय? अशा धोरणामुळं शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. ”सत्ताधार्‍यांविरोधातील मतांची विभागणी होऊ नये, हा इंडिया आघाडी निर्माण करण्यामागचा उद्देश होता. आमची मतं विभागली गेली नाहीत, तर नक्की इंडिया आघाडीला बहुमत मिळेल,” असा विश्‍वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसंच यापूर्वी मोदींच्या विरोधात 60 ते 70 टक्के लोकांनी मतदान केल आहे. ते जर एकवटले तर मोदींचा पराभव होऊ शकतो,” असं मतही त्यांनी व्यक्त केल आहे.

Exit mobile version