भाजप वर्धापनदिनात मार्गदर्शन
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील राजकीय घराणेशाही मोडीत काढून टाकून राष्ट्रभक्तीचे राजकारण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे बोलताना केले. भाजपच्या 42 वा स्थापना दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात दोन प्रकारचे राजकारण सुरु आहे. एक राजकारण आहे परिवार भक्तीचं आणि दुसरं आहे राष्ट्रभक्तीचं राजकारण. केंद्रीय स्तरावर काही राजकीय पक्ष आहेत जे आपापल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत आहेत. यामध्ये परिवारातील सदस्यांचाच स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये दबदबा राहतो. गेल्या दशकामध्ये यामुळे देशाचं नुकसान झालं आहे. पहिल्यांदा भाजपनेच यावर बोलायला सुरु केलं आणि निवडणुकीतील मुद्दा बनवला. देशातील तरुण आता हळूहळू हे ओळखू लागले आहेत की परिवारवादी पक्ष लोकशाहीचे शत्रू कसे आहेत. लोकशाहीसोबत खेळणारे हे पक्ष संविधान आणि त्याच्या व्यवस्थांचा खेळ करत आहेत. लोकशाहीविरोधी शक्तींना नेस्तनाबूत केल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये, असा एल्गारही त्यांनी पुकारला आहे.
पुढे काँग्रेसवर टीका करत मोदी म्हणाले की, काही पक्षांनी दशकांपासून फक्त वोट बँकेचं राजकारण केलं. काही लोकांनाच आश्वासन द्यायचं. काहींना त्रास द्यायचा, असंच चालू राहिलं. भेदभाव भ्रष्टाचार हे वोट बँकेच्या राजकारणाचा साईड इफेक्ट होता. भाजपने या सार्याला टक्कर दिली तसेच देशवासीयांना याचं महत्त्व पटवून दिलं. भाजपचं चांगलं काम असल्याने जनतेकडून आशीर्वाद मिळत आहे. देशात असं सरकार आहे, ज्याची वैचारिक निष्ठा अंत्योदयात आहे. गरीब, वंचित आणि महिलांसाठी काम करणं हे आमचे मूळ सरकार आहे. देशाने महिलांना नवे अधिकार दिले. सुशासन आणि कठोर कायद्यांतून सुरक्षेची भावना तयार केली. त्यांच्या आरोग्यापासून ते स्वयंपाकघराची चिंता मिटवून टाकली आणि त्यांचं आयुष्य बदलवून टाकलं आहे.
सबका साथ, सबका विकास सोबतच आम्ही सबका विश्वासही प्राप्त करत आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी लाभ पोहचवला जावा, हाच उद्देश आहे. जेंव्हा हे घडतं तेंव्हा पक्षपात आणि भेदभाव टिकू शकत नाही. त्यामुळे आपलं हे सेवाभाव अभियान सामाजिक न्यायाचं उदाहरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला प्रत्येक घरात जाऊन आपला विचार द्यायचा आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान