आंदोलन पेटलं! पुण्यात मुंबई-बंगळुरु महामार्ग रोखला; पुण्यात टायर पेटवले

| पुणे | प्रतिनिधी |
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात आली होती. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.

पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

डी.सी.पी. सोहेल शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुंबई-बंगळुरु हा महामार्ग देशातील महत्त्वाचा मार्ग आहे. पहिल्या अर्धा तासात साताऱ्याकडील वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्याशिवाय सर्व्हिस रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली, अशी माहिती सोहेल शर्मा यांनी दिली.

तब्बल अडीच तासानंतर नवले ब्रिजावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टायर जाळून जाळपोळ केल्याने तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असं मराठा आंदोलकांनी म्हटलं.

राज्यात एवढं सगळं घडत असताना गृहमंत्री कुठे आहेत. जालना प्रकरण, ड्रग्ज प्रकरण, बीडचं प्रकरण झालं आणि आज नवले पुलावरील घटना हे सगळं घडत असताना गृहमंत्री कुठे आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री असताना दिलं होतं. मात्र अद्यापही तसे झाले नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Exit mobile version