धुतूम ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

उरण । प्रतिनिधी ।

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने धुतूम ग्रामपंचायत आणि तेरणा हाँस्पिटल ब्लड बँकच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 14) रक्तदान शिबिराचे आयोजन धुतूम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी तरुणाईला रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केले. या शिबिरात जवळपास 35 तरुणानी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर यांनी नमूद केले. रक्तदात्याना भेट वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच सुचिता कडू यांनी उपस्थित डॉक्टर आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, स्मिता ठाकूर, कविता ठाकूर, अनिता ठाकूर, करिष्मा ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version