पत्नी-मुलीसह जखमी, स्कूटीची तोडफोड
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील द्रोणागिरी येथील निर्मल हाईट्स, सेक्टर 50 परिसरात अंगावर खरकटे पाणी उडाल्याचा जाब विचारणे एका लॉजिस्टिक्स व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. याच कारणावरून तेथील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तींनी जमाव जमवून संबंधित व्यावसायिकावर तसेच त्याच्या पत्नी व लहान मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, उरण पोलीस ठाण्यात तिघांसह 10-15 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश विनोद भोईर (38) रा. जसखार हे दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी व लहान मुलीसह स्कूटीवरून निर्मल हाईट्स, सेक्टर 50, द्रोणागिरी येथून जात होते. त्याचवेळी तेथे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या अंगावर खरकटे पाणी उडवले. याबाबत रुपेश भोईर यांनी जाब विचारताच तेथील परप्रांतीय व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात रुपेश भोईर जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता संतप्त जमावाने दांडके व अन्य हत्यारांनी रुपेश भोईर यांची स्कूटी पूर्णपणे फोडून टाकली, तसेच पत्नी व मुलीच्या दिशेनेही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेची माहिती पसरताच परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. किरकोळ कारणावरून स्थानिक नागरिकावर जीवघेणा हल्ला केल्याने तसेच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतियांच्या मुजोरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या अगोदर ही कोप्रोली, चिरनेर, द्रोणागिरी नोड परिसरात परप्रांतीय नागरिकांनी स्थानिकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे परप्रांतीय नागरिकांची दहशत मोडीत काढण्यासाठी अशा अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
याप्रकरणी गुड्डू सिंग, बंटी सिंग आणि संदिप सिंग या तिघांसह 10-15 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच दि. 10 सप्टेंबर रोजी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक निलेश कोंडाळकर, गोविंद केंद्रे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. उरण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.





