| कर्जत | प्रतिनिधी |
कोकण ज्ञानपीठचे संस्थापक प्रभाकर नारायण तथा आप्पासाहेब धारकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयामध्ये समर्पण ब्लड बँक खोपोलीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 40 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले कर्जत-खालापूर तालुक्यातील हे 464 वे रक्तदान शिबीर होते.
डॉ. अभिषिका वाघचौरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयीन विकास समिती सदस्य दीपक बोराडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, गोविंद भगनुरे, डॉ. भरत टेकाडे, प्रा. बबन थावकर, शिवराम पाटील आदी उपस्थित होते. महेश म्हात्रे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. यावेळी रक्त कोणत्याही कारखान्यात तयार नाही. त्यामुळे रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवण्यास सहकार्य करा, असे आवाहन केले. समर्पण ब्लड बँकेच्या धनश्री लाड, विजय मोहिते, वैभवी ओरसकर, अंकिता जाधव, सूरज जाधव, प्रफुल्ल घाणेकर आदींनी रक्त संकलनाचे काम केले. रिया कांबळे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.