। कर्जत । प्रतिनिधी ।
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत व लायन्स क्लब ऑफ कर्जत डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी संयोजित केलेले हे कर्जत-खालापूर तालुक्यातील 452 वे रक्तदान शिबीर ठरले. कर्जत शहरातील कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ कर्जत डायमंडच्या अध्यक्षा अॅड. गायत्री पेठे व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी, मुग्धा ठोसर, संगीता गोडबोले, डॉ. शारदा निवाते, संपदा ढाकवळ, अभिजित मराठे, निलेश परदेशी, पंकज शाह, किशोर वैद्य, गणेश ठोसर आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात गणेश ठोसर यांनी 110 वे रक्तदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. याप्रसंगी रक्तसंकलनाचे काम घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीचे डॉ. शेख, लक्ष्मीकांत नाईक, कविता भालेराव, धनश्री जाधव आदींनी केले.