श्रीवर्धन बीचवरील स्वच्छतागृह 4 महिने कुलूपबंद; 35 लाखांचा प्रकल्प वाया?
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याचा टेंभा मिरवणाऱ्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरच मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नगरपरिषदेकडून सुमारे 35 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले अत्याधुनिक स्वच्छतागृह व स्नानगृह उद्घाटनानंतरही मागील चार महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहे. त्यामुळे ‘ब्ल्यू फ्लॅग’ हा फक्त दिखावा ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पर्यटक व स्थानिक नागरिकांतून उमटत आहे.
या स्वच्छतागृहाचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतरही प्रत्यक्षात सुविधा सुरू न झाल्याने हा सगळा उपक्रम केवळ दिखाव्यासाठी होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
श्रीवर्धन हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या काळात येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र, अशा ठिकाणी स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा बंद असल्याने पर्यटकांची अक्षरशः गैरसोय होत आहे. अनेकांना उघड्यावरच आपली गरज भागवावी लागत असून, काहींना कपडे बदलण्यासाठी जवळच्या हॉटेल्स व रिसॉर्ट्सकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी, समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेवरही गंभीर परिणाम होत असून दुर्गंधी व अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ‘स्वच्छता’ आणि ‘मूलभूत सुविधा’ या निकषांवरच ब्ल्यू फ्लॅग मानांकन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात या निकषांची पायमल्ली होत असताना संबंधित प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘ब्ल्यू फ्लॅग’ हा केवळ कागदोपत्री दर्जा ठरतोय का? असा संतप्त सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या संदर्भात विचारले असता मुख्याधिकारी यांनी ‘मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने स्वच्छतागृह सुरू करण्यात विलंब होत आहे’, असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, कोट्यवधींच्या प्रकल्पांवर खर्च करणाऱ्या प्रशासनाला एक कर्मचारी मिळत नाही, ही बाब अधिकच आश्चर्यकारक असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
याचबरोबर, काही समाजकंटकांकडून स्वच्छतागृह व स्नानगृहांची तोडफोड झाल्याचेही समोर आले आहे. योग्य देखभाल व सुरक्षेअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक मुतारी व स्वच्छतागृहांची आधीच कमतरता आहे. त्यात नवीन उभारलेली सुविधा देखील बंद ठेवली जाते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.’ एकूणच, 35 लाख रुपये खर्चून उभारलेले स्वच्छतागृह वापरात न आणल्यास तो थेट शासकीय निधीचा अपव्यय ठरणार असून, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तातडीने स्वच्छतागृह सुरू करून देखभाल व्यवस्था कायमस्वरूपी उभी करावी, अन्यथा ‘ब्ल्यू फ्लॅग’चा दर्जा केवळ नावापुरताच उरेल, असा इशाराही नागरिक व पर्यटकांनी दिला आहे.






