| रोहा | प्रतिनिधी |
श्री धावीर मंदिरच्या पाठीमागे असलेल्या मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या मोकळ्या जागेत रहादारीचा रस्ता तयार झाल्याने ही मोकळी जागा धावीर मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावी. त्याचप्रमाणे मोहल्ल्यात व बायपास मार्गे येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्ग व्हावे, यासाठी विहीरच्या उत्तर बाजूस नव्याने भूसंपादन करण्यात येणार आहे. त्या भूसंपदनाचा प्रश्न देखील मार्गी लागला असून नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या शिष्टाईने रस्त्याचा तिढा सुटला असून नव्याने भूसंपादन होणाऱ्या जमीन मालकाने देखील या कामी होकार दिला आहे. त्या जमीन मालकाला नगर पालिकेकडून टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा व नगरपालिका प्रशासनाने दिले आहे.
रोह्यातील फिरोज टॉकीज ते श्री धावीर मंदिर या सुमारे 700 मीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी मार्गाचा हा रस्ता असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. रोहा शहर विकास आराखड्यानुसार हा रस्ता मंदिरालगत गौलवाडी गावाकडे जातो. पूर्वी पायी वहिवाट असल्याने हा मार्ग श्री धावीर देवस्थानच्या मोकळ्या जागेतून तयार करण्यात आला होता. रस्ता मध्यभागी गेल्याने संरक्षक भिंत उभारणे शक्य होत नव्हते. रोह्याच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांची श्री धावीर देवस्थान ट्रस्टमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ट्रस्टच्या मालकीची जागा ट्रस्टच्या ताब्यात देणे व भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि.27) आपल्या दालनात नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान ट्रस्ट यांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत देवस्थानची जागा मोकळी करून शहर विकास आराखड्यानुसार रस्ता देवस्थान प्रांगणाबाहेरून नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता देवस्थान परिसर चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून सुरक्षित करता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, नवीन पर्यायी मार्गासाठी नगरपालिकेने संबंधित जमीनमालकांकडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या जमीन मालकाला भूसंपादनासाठी टीडीआरच्या माध्यमातून मोबदला देण्यात येणार आहे. या बैठकीत उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, निता हजारे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, नितीन परब, काशिनाथ धाटावकर, महेश सरदार, समीर शेडगे, बापू जोशी, समीर साळवी, परशूराम चव्हाण व स्वप्नील धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.







