बारावीची 6, तर दहावीची 15 फेब्रुवारीला परीक्षा
| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 6 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान होणार आहे. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक 6 डिसेंबरपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे शिक्षकांना अध्यापनाचे नियोजन, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे शक्य होणार आहे.
राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारे वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी त्यानुसारच परीक्षेची तयारी करावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. माळी यांनी नमूद केले.
