मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. नेरळजवळील जिते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशाची मागणी केली होती. दरम्यान, जानेवारी महिन्यात कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते.

नेरळजवळील दामत येथील रहिवासी मुसेफ मुजाहित खोत यांनी जिते या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात फेर्‍या मारत होते. त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी 15 हजारांची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नितीन दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले.

नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदर लाचप्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले. नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जानेवारी 2025 मध्ये तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लाच घेण्याचा लागलेला शाप काही दूर होण्याचे नाव घेत नाही.

Exit mobile version