अमरावतीच्या वर्धा नदीत बोट पलटी ;11 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती

। अम्रावती। वृत्तसंस्था।

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत मंगळवारी एक बोट बुडाल्याने किमान 11 जण बुडाल्याची भीती आहे, असे पोलिसांनी सांगितले. एका अधिकार्‍याने सांगितले की, पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी एका अल्पवयीन मुलीसह तीन मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत.
ही घटना बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्राना गावात सकाळी 10.30 च्या सुमारास घडली, जिथे तीन कुटुंबातील 11 लोकांना घेऊन जाणारी एक बोट पलटी झाली. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे.
स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. वर्धा नदीच्या तिरावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनासह स्थानिक लोक उपस्थित आहेत. यामध्ये 11 जण बुडाले असून तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहे. उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे, असे स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

Exit mobile version