वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही बोटी समुद्रात
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत पाटील यांच्या मालकीची ‘तळजाई’ नावाची मच्छीमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ पलटी होऊन पाच मच्छीमार कामगार बचावले तर तीन जण बेपत्ता असल्याची घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील मोरा समुद्र किनारी आणखी एक बोट बुडून एका खलाश्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.27) रात्री घडली आहे.
वादळी हवामानामुळे समुद्रात प्रवासी वाहतूक बंद आहे. त्याप्रमाणे मासेमारीसाठी ही बंदी असताना बोटी समुद्राच्या पाण्यात बेधडकपणे विहार करताना दिसत आहेत. मात्र, याचे सोयर सुतक येथील मत्स्यव्यावसाय अधिकारी तसेच बंदर अधिकारी यांना नसल्याने अशा प्रकारचे अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रकार घडत असल्याचे आरोप येथील स्थानिक मच्छिमारांनी केले आहेत. दरम्यान, मोरा जेट्टी जवळ बुडालेल्या बोटीत दहा खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. मासेमारीकरून माघारी येत असताना ही छोटी बोट उलटली. या अपघातामध्ये बोटीवरील नऊ खलाशी आपला शीव वाचवण्यात यशस्वी ठरले. मात्र, एका खलाशाचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना निश्चितच शासकीय यंत्रणांना आव्हान देणारी ठरत आहे. आता तरी शासकीय यंत्रणा याबाबत गंभीर होणार की आणखी जीव जाण्याची वाट पहाणार? मत्स्यव्यवसाय व बंदर अधिकाऱ्यांची फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत की यामागे काही आर्थिक साटेलोटे आहेत ? असा सवाल आता मच्छिमार आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत.







