बोट बुडाली गुजरातमध्ये धसका मात्र दिवेआगरात

| अलिबाग | प्रतिनिधी |

दिवेआगर येथील समुद्रात बुडलेल्या बोटीने स्थानिक खलाशांमध्ये रविवारी भिती निर्माण झाली होती. परंतु गुरुवारी गुजरातमधील बुडालेली बोट असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

दिघी आडगावमधील समुद्रामध्ये 9 मैल अंतरावर 17 ऑगस्ट रोजी बना सागर नावाच्या गुजरात येथील मच्छीमार बोटीतून मासेमारी करत असताना बोटीच्या खालील फळी तुटली. त्यामुळे बोटीत हळूहळू पाणी शिरू लागले. बोट बुडत असल्याचे बाजुला असलेल्या गुजरातमधील दोन बोटीतील खलाशांच्या लक्षात आले. त्यांनी बुडत असलेल्या खलाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तटरक्षक दलाच्या बोट मदतीसाठी धावली. बुडत असलेल्या बोटीतील सात खलाशांना वाचविण्यात यश आले. बोटही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याने भरलेली बोट किनारी आणताना अडथळे निर्माण झाले. दरम्यान अंधार पडल्यावर बोट काढण्याचे काम थांबवण्यात आले. कोस्ट गार्डचे असिस्टंट कमांडंट यांनी बोटीच्या मालकाशी संपर्क करून सर्व प्रवासी सुखरूप असल्याबाबतची खात्री केली. भरडखोल येथील काही मच्छीमार समुद्रात मच्छीमारीसाठी जात असताना त्यांना दिवेआगर आडगाव यांच्या दरम्यान एक बोट बुडाल्याची दिसली. 17 ऑगस्ट रोजी बुडालेली बोट असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी बोट पूर्णपणे बुडून खाली गेली नसल्याने ती वाहत दिवेआगर बाजूला आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version