। मुंबई । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बुधवार दि.8 रोजी मुंबई सहाराच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील मेट्रो मार्गिका 3 आणि नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावरील सर्व प्रवासी बोटींची वाहतूक पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते राजभवन आणि ताज हॉटेल येथे भेट देणार आहेत. या ठिकाणांवरील सुरक्षेच्या दृष्टीने गेटवे परिसर आणि परिसरातील सागरी क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात गेटवे ऑफ इंडिया परिसरात कोणत्याही प्रवासी बोटी, फेरी सेवा किंवा जलवाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे गेटवे ते मांडवा, अलिबाग, मुरुड तसेच इतर किनारी भागांदरम्यानची फेरी सेवा आज दुपार पासून बंद राहणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव लागू असलेल्या या बंदोबस्तात सहकार्य करावे आणि नियोजित बोट प्रवासाचे वेळापत्रक बदलावे. तसेच, अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी प्रवासाची पूर्वतयारी ठेवावी.






